वॉशिंग्टन: कोविडवरच्या औषधांवरचे संशोधन चोरण्यासाठी हे संशोधन करणाऱ्या अनेक कंपन्यांमध्ये हॅकिंग करणाऱ्या दोघा चिनी नागरिकांना अमेरिकेत ताब्यात घेण्यात आले आहे. या सायबर चोरांनी औषधांबाबतच्या माहितीबरोबरच संरक्षणासाठी विदेशातील कंपन्यांबरोबरच्या कंत्राटांची माहितीची चोरी या दोघांनी केली आहे.
याशिवाय अमेरिका, चीन आणि हॉंगकॉंगमधील मानवी हक्क विषयक संस्थांमध्येही या दोघांनी सायबर चोरी करण्याचा उद्योग केला आहे. करोना आणि जागतिक व्यापारातील रस्सीखेचमुळे आमेरिका आणि चीनमधील तणाव शिगेला पोहोचला असतानाच हे प्रकरण उघडकीस आले आहे.
ली क्सोयू आणि डोंग जिशी अशी या दोघांची नावे असून हे दोघेही इंजिनिअर आहेत आणि गेल्या 10 वर्षांपासून कॉम्प्युटर हॅकिंगच्या उद्योगामध्ये सक्रिय आहेत. त्यांनी आतापर्यंत अमेरिका, ऑस्ट्रेलिया, बेल्जियम, जर्मनी, जपान, लिथुआनिया, नेदरलॅंड्स, स्पेन, दक्षिण कोरिया, स्वीडन आणि ब्रिटनमधील कंपन्यांना लक्ष्य केले आहे.
वैद्यकीय डिव्हाइस, नागरी आणि औद्योगिक अभियांत्रिकी, व्यवसाय, शैक्षणिक आणि गेमिंग सॉफ्टवेअर. सौर उर्जा, औषधनिर्माण, संरक्षण, उच्च तंत्रज्ञान उत्पादन आदी क्षेत्रांशी संबंधित कंपन्यांमध्ये त्यांनी हॅकिंग केलेले आहे. सगळ्यात अलिकडे कोविडवरील उपचारासाठी औषधांसाठी संशोधन करणाऱ्या कंपन्यांचा मौल्यवान डाटा चोरण्यासाठीही त्यांनी हॅकिंग केले आहे.
याशिवाय दलाई लामा यांच्या कार्यालयातील ईमेलचेही हॅकिंग यांनी केले आहे. या दोघांनी संरक्षण उपग्रह, लष्करी वायरलेस नेटवर्क आणि कम्युनिकेशन प्रणाली आणि मायक्रोवेव्ह आणि लेझर सिस्टम संबंधी संरक्षण कंत्राटदारांकडून माहिती चोरी केली गेली. ही चोरलेली माहिती चीनमध्ये विकली जात असल्याचा संशय आहे. या संदर्भात या दोघांकडे चौकशी सुरू आहे.
“रशिया, इराण, उत्तर कोरिया या देशांमध्ये आतापर्यंत गुन्हेगारांना सुरक्षित आश्रय मिळत होता. आता या देशांबरोबर चीननेही स्थान मिळवले आहे. हा गुन्हेगारांचाच क्लब बनला आहे.’ अशी टीका असिस्टंट ऍटर्नी जनरल जॉन डिमर्स यांनी केली.