बर्मिंगहॅम – लारेमसियामीने मोक्याच्या क्षणी केलेल्या अफलातून गोलच्या जोरावर भारताच्या महिला हॉकी संघाने कॅनडाचा पराभव करत राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत महिलांच्या हॉकी स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली.
गेल्या काही काळापासून संमिश्र यश मिळवत असलेल्या भारताच्या महिला हॉकी संघाने या सामन्यात मात्र, सुरुवातीपासूनच वर्चस्व राखले. सामन्याला प्रारंभ झाल्यावर लगेचच तिसऱ्याच मिनिटाला सलिमा टेटे हिने गोल केला. त्यानंतर 22 व्या मिनिटाला नवनित कौरने गोल करत कॅनडाचा बचाव भेदला. मात्र, पिछाडीवरून कॅनडाने जबरदस्त पुनरागमन केले.
ब्रेनी स्टेअर्सने 23 व्या मिनिटाला गोल करत ही आघाडी कमी केली. तर, 39 व्या मिनिटाला हेनाह हुआनने गोल करत सामन्यात बरोबरी साधली. यानंतर दोन्ही संघांनी एकमेकांचा बचाव भेदण्याचे सातत्याने केलेलेप्रयत्न अपयशी ठरले. अखेर 51 व्या मिनिटाला लारेमसियामीने गोल केला व भारताला पुन्हा एकदा 3-2 अशी आघाडी मिळवून दिली.
त्यानंतर भारताने भक्कम बचाव करत याच गोलसंख्येवर सामना जिंकत उपांत्य फेरी गाठली. भारताला इंग्लंडकडून पराभव पत्करावा लागला होता, त्यामुळे हा सामना अत्यंत महत्त्वाचा बनला होता.