लखनौ :– विश्वकरंडक 2023 स्पर्धेतील 19 व्या सामन्यात सदिरा समरविक्रमाच्या मोक्याच्या खेळीच्या जोरावर श्रीलंकेने शनिवारी एकना मैदानावर झालेल्या सामन्यात 10 चेंडू शिल्लक असताना पाच विकेट्सने नेदरलॅंडचा पराभव करताना पहिल्या विजयाची नोंद केली.
गेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेला पराभूत करून सनसनाटी निर्माण करणाऱ्या नेदरलॅंड्सने या सामन्यात श्रीलंकेवर अनेकवेळा वरचष्मा ठेवला होता. त्यांनी श्रीलंकेसमोर 263 धावांचे आव्हानात्मक लक्ष्य ठेवले आणि यानंतर त्यांच्या गोलंदाजांनी श्रीलंकेच्या टॉप ऑर्डरला हादरा देऊन अडचणीत आणले. मात्र, समरविक्रमाने 107 चेंडूंत सात चौकारांच्या मदतीने 91 धावांची नाबाद खेळी करत श्रीलंकेला 48.2 षटकांतच विजय मिळवून दिला.
श्रीलंकेच्या आघाडीच्या फळीत केवळ पाथुम निसांका (54) उपयुक्त योगदान देऊ शकला. समरविक्रमाने त्याच्यासोबत तिसऱ्या विकेटसाठी 52 धावांची भागीदारी केल्यानंतर चरिथ असलंका (44) याच्यासोबत चौथ्या विकेटसाठी 77 धावांची भागीदारी करत विजयाचा टप्पा गाठला. त्यानंतर समरविक्रमाने धनंजय डी सिल्वा (30) सोबत पाचव्या विकेटसाठी 76 धावांची भागीदारी केली, ज्यामुळे लंकेचा विजय सुकर झाला.
We secure a much-needed win, defeating Netherlands by five wickets. The #LankanLions are officially off the mark! 🇱🇰🏏 #CWC23 #SLvNED pic.twitter.com/RasDdLTIya
— Sri Lanka Cricket 🇱🇰 (@OfficialSLC) October 21, 2023
तत्पूर्वी, सायब्रॅंड एंजेलब्रेक्टने नेदरलॅंडसाठी 82 चेंडूत चार चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 70 धावा केल्या, तर लोगन व्हॅन बीकने 75 चेंडूत 59 धावांची दमदार खेळी केली. या दोघांनी सातव्या विकेटसाठी 130 धावांची भागीदारी केली जी विश्वकरंडकातील नवा विक्रम आहे.
संक्षिप्त धावफलक –
नेदरलॅंड : 49.4 षटकांत सर्वबाद 262 (सायब्रॅंड एंजेलब्रेक्ट 70, लोगन व्हॅन बीक 59; दिलशान मधुशनाका 4-49, कसुन रजिता 4-50, महेशा थिकशाना 1-44)
श्रीलंका : 48.2 षटकांत 5 बाद 263 (सदिरा समरविक्रमा 91, चरिथ असलंका 44, धनंजय डी सिल्वा 30; आर्यन दत्त 3-44, पॉल वॅन मिकेरन 1-39, कोलिन ऍकेरमन 1-39).