हैदराबाद :- एकदिवसीय विश्वचषकाच्या दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानसमोर नेदरलँड्सचे आव्हान आहे. दोन्ही संघांमधील हा सामना हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर सुरू आहे. या सामन्यात नेदरलँड्सचा कर्णधार स्कॉट एडवर्ड्सने टाॅस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
सध्या, पाकिस्तान संघाची फलंदाजी सुरू असून शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा पाकिस्तानच्या 33.3 षटकांत 6 बाद 193 धावा झाल्या असून सध्या क्रीजवर मोहम्मद नवाज 5(8) आणि शादाब खान 5(3) खेळत आहेत.
बास डी लीडेनेही पाकिस्तानला सहावा धक्का दिला. त्याने 32 व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर इफ्तिखार अहमदला बाद केले. इफ्तिखारने नऊ चेंडूत 11 धावा केल्या आणि त्याला यष्टिरक्षक स्कॉट एडवर्ड्सने झेलबाद केले. त्याच षटकात बास डी लीडेने रिझवानला बाद केले होते. पाकिस्तानला 182 धावांवर पाचवा धक्का बसला. रिझवान 75 चेंडूंत आठ चौकारांच्या मदतीने 68 धावा करून बाद झाला. तर त्याआधी पाकिस्तानला 158 धावांवर चौथा धक्का बसला. सौद शकील 52 चेंडूंत नऊ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 68 धावा करून बाद झाला. त्याने मोहम्मद रिझवानसोबत चौथ्या विकेटसाठी 120 धावांची भागीदारी केली.
इमाम उल हकच्या रूपाने पाकिस्तानला तिसरा धक्का बसला. पॉल व्हॅन मीकरेनने इमाम अल हकला बाद केले. इमाम 19 चेंडूत 15 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला.या सामन्यात कर्णधार बाबर आझमही अपयशी ठरला. नेदरलँडविरुद्ध त्याला केवळ पाच धावा करता आल्या. त्याने 18 चेंडूंचा सामना केला. कॉलिन अकरमनने त्याला साकिब झुल्फिकारकरवी झेलबाद केले. नेदरलँडविरुद्ध फखर जमान यानेही अपेक्षित कामगिरी केली नाही आणि तो 15 चेंडूत 12 धावा करून तो बाद झाला.
दोन्ही संघांचे प्लेइंग-11 खालीलप्रमाणे –
पाकिस्तान : इमाम उल हक, फखर जमान, बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), सौद शकील, इफ्तिखार अहमद, शादाब खान, मोहम्मद नवाज, हसन अली, शाहीन आफ्रिदी, हरिस रौफ.
नेदरलँड्स : विक्रमजीत सिंग, मॅक्स ओड, कॉलिन अकरमन, स्कॉट एडवर्ड्स (विकेटकीपर/कर्णधार), बास डी लीडे, तेजा निदामनुरु, साकिब झुल्फिकार, लोगान व्हॅन बीक, रोलोफ व्हॅन डर मर्वे, आर्यन दत्त, पॉल व्हॅन मीकरेन.