World Cup 2023 New Zealand vs Afghanistan :- विल यंग, कर्णधार टॉम लॅथम व ग्लेन फिलीप्स यांनी केलेल्या आक्रमक अर्धशतकी खेळीच्या जोरावर न्यूझीलंडने एकदिवसीय सामन्यांच्या विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत अफगाणिस्तानसमोर विजयासाठी 289 धावा करण्याचे आव्हान ठेवले आहे.
Glenn Phillips (71), skipper Tom Latham (68) and Will Young (54) help build the total in Chennai. Time to bowl! Follow play LIVE in NZ with @skysportnz. LIVE scoring |https://t.co/KwEW5rcWOQ #CWC23 pic.twitter.com/onpsFsbbGC
— BLACKCAPS (@BLACKCAPS) October 18, 2023
अफगाणिस्तानचा कर्णधार हसमतुल्ला शाहिदीने नाणेफेक जिंकत न्यूझीलंडला पहिल्यांदा फलंदाजी देण्याचा निर्णय घेतला. मुजीब उर रेहमानने भरात असलेल्या डेव्हन कॉनवेला बाद करत सुरुवातही थाटात केली. मात्र, त्यानंतर विल यंगने राचीन रवींद्रसह जबाबदारीने परंतू आक्रमक फलंदाजी करत डाव सावरताना संघाचे शतक फलकावर लावले. राचीन चांगला खेळत असताना 41 चेंडूत 2 चौकार व 1 षटकार फटकावत 32 धावांवर परतला. त्यानंतर न्यूझीलंडच्या डावाची थोडी घसरण झाली. अर्धशतक थाटात साकार केलेला यंग आततायी फटका मारताना 54 धावांवर बाद झाला. या खेळीत त्याने 64 चेंडूंचा सामना करताना 4 चौकार व 3 षटकार फटकावले.
त्याच्या पाठोपाठ डॅरेल मिशेलनेही निराशा केली. त्यांचा डाव अडचणीत आलेला असताना कर्णधार टॉम लॅथमने ग्लेन फिलीप्सच्या साथीत भक्कम फलंदाजी केली. त्यांनी अफगाणिस्तानच्या गोलंदाजांवर हल्ला चढवला. या जोडीने आपापली अर्धशतके पूर्ण करताना चौथ्या गड्यासाठी 144 धावांची भागीदारी करत संघाला अडीचशे धावांची मजल मारुन दिली. त्यानंतर हे दोन्ही फलंदाज पाठोपाठ बाद झाले.
फिलीप्सने 71 धावांच्या खेळीत 80 चेंडूत 4 चौकार व 4 षटकारांची आतषबाजी केली. लॅथमने 68 धावांची खेळी करताना 74 चेंडूत 3 चौकार व 2 षटकार मारले. तळात मार्क चॅपमनने छोटी परंतु वेगवान खेळी करत मिचेल सॅंटनरसह संघाला 50 षटकांत 6 बाद 288 अशी समाधानकारक धावसंख्या उभारुन दिली. चॅपमनने 12 चेंडूत 2 चौकार व 1 षटकार फटकावताना नाबाद 25 धावा केल्या तर, सॅंटनर 7 धावांवर नाबाद राहीला. अफगाणिस्तानकडून नवीन उल हक व अजमतुल्ला ओमरझाई यांनी प्रत्येकी 2 बळी घेतले. मुजीब उर रेहमान व रशीद खान यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक –
न्यूझीलंड – 50 षटकांत 6 बाद 288 धावा. (ग्लेन फिलीप्स 71, टॉम लॅथम 68, विल यंग 54, राचीन रवींद्र 32, डेव्हन कॉनवे 20, मार्क चॅपमन नाबाद 25, मिचेल सॅंटनर नाबाद 7, नवीन उल हक 2-48, अजमतुल्ला ओमरझाई 2-56, रशीद खान 1-43, मुजीब उर रेहमान 1-57).