ICC ODI World Cup 2023 Australia vs Sri Lanka Live Score : आज विश्वचषक 2023 च्या 14 व्या सामन्यात पाच वेळचा चॅम्पियन ऑस्ट्रेलियाचा सामना 1996 च्या चॅम्पियन श्रीलंकेशी होत आहे. लखनौच्या एकना स्टेडियमवर श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. लंकेचा संघ 43.3 षटकात 209 धावांवर सर्वबाद झाला. ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 210 धावांचे लक्ष्य मिळाले आहे.
24 धावांवर 2 फलंदाज बाद…
विजयासाठी 210 धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाला 3.1 षटकात पहिला धक्का डेव्हिड वॉर्नरच्या रूपाने बसला. दिलशान मदुशंकाच्या चेंडूवर तो एलबीडब्ल्यू(lbw) झाला. मदुशंकाचा चेंडू वॉर्नरच्या पॅडला लागला. अंपायरने त्याला थेट आऊट दिले. वॉर्नरने रिव्ह्यू घेतला. सुरुवातीला चेंडू लेगस्टंपच्या बाहेर जात असल्याचे दिसत होते, परंतु ट्रॅकरने चेंडू विकेटला स्पर्श करत असल्याचे दाखवले. अशा स्थितीत तो अंपायरचा कॉल म्हणून त्याला बाद घोषित करण्यात आले. त्यामुळं पॅव्हेलियनमध्ये परतताना तो खूप रागावलेला दिसत होता.
याच षटकातील शेवटच्या चेंडूवर मदुशंकाने स्टीव्ह स्मिथला बाद केले. स्मिथ तर खाते न उघडताच एलबीडब्ल्यू (LBW) झाला. स्मिथ बाद झाला तेव्हा ऑस्ट्रेलियाची धावसंख्या चार षटकांत दोन गडी गमावून 24 धावा अशी होती.
मार्श अन् लॅबुशेननं डाव सावरला..
त्यानंतर मिचेल मार्श अन् मार्नस लॅबुशेन यांनी ऑस्ट्रेलियाला डाव सावरला आहे. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा ऑस्ट्रेलिया संघाच्या 10 षटकात 2 बाद 64 धावा असून त्यांना विजयासाठी आणखी 146 धावांची आवश्यकता आहे. मिचेल मार्श हा 45*(35) अन् मार्नस लॅबुशेन हा 8*(14) धावांवर खेळत आहेत.
तत्पूर्वी, ऑस्ट्रेलियन संघाने श्रीलंकेचा डाव 43.3 षटकांत 209 धावांत गुंडाळला आहे. श्रीलंकेच्या संघाला चांगल्या सुरुवातीचा फायदा उठवता आला नाही. कुसल परेरा आणि पथुम निसांका यांनी पहिल्या विकेटसाठी 125 धावांची भागीदारी करून श्रीलंकेला दमदार सुरुवात करून दिली. निसांका 67 चेंडूत 61 धावा करून बाद झाला. त्याने आपल्या खेळीत आठ चौकार मारले. त्यांच्यानंतर परेरा 82 चेंडूत 78 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. त्याने आपल्या खेळीत 12 चौकार मारले. हे दोघे बाद झाल्यानंतर लंकेचा संघ 209 धावांवर गडगडला. श्रीलंकेच्या 9 विकेट केवळ 84 धावांवर पडल्या.
निसांका आणि मेंडिस व्यतिरिक्त फक्त चरित अस्लंकाला दुहेरी आकडा गाठता आला. त्याने 25 धावा केल्या. दासून शनाका बाद झाल्यानंतर कर्णधार असलेल्या कुसल मेंडिसला केवळ नऊ धावा करता आल्या. पाकिस्तानविरुद्ध शतक झळकावणारा सदीरा समरविक्रमा आठ धावांवर बाद झाला. धनंजय डी सिल्वा सात आणि लाहिरू कुमारा चार धावा करून बाद झाले. चमिका करुणारत्ने आणि दुनिथ वेललागे यांना प्रत्येकी दोनच धावा करता आल्या. महिशला तिक्षीना खाते उघडता आले नाही. तर, दिलशान मदुशंका खाते न उघडता नाबाद राहिला.
ऑस्ट्रेलियाकडून लेगस्पिनर अॅडम झाम्पाने सर्वाधिक चार विकेट घेतल्या. झाम्पाने 8.0 षटकात 47 धावा दिल्या. मिचेल स्टार्क आणि पॅट कमिन्स यांना प्रत्येकी दोन यश मिळाले. स्टार्कने 10 षटकात 43 तर कमिन्स यानं 7.0 षटकात 32 धावा दिल्या. ग्लेन मॅक्सवेलने एक विकेट घेतली. त्यानं 9.3 षटकात 36 धावा दिल्या. जोश हेझलवूड यांन 7 षटकात 36 धावा दिल्या, त्याला एकही गडी बाद करता आला नाही.