World Cup 2023 Australia vs Pakistan Match Live Score : विश्वचषक 2023 स्पर्धेच्या 18 व्या सामन्यात ऑस्ट्रेलियासमोर पाकिस्तानचे आव्हान आहे. बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर दोन्ही संघ आमनेसामने आहेत. सलग दुसऱ्या विजयाकडे ऑस्ट्रेलियाचे लक्ष लागले आहे. गेल्या सामन्यात त्यांनी श्रीलंकेचा पराभव केला होता. त्याचवेळी पाकिस्तानला भारताविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्यामुळे बाबर आझमचा संघ विजयी मार्गावर परतण्यास इच्छुक आहे.
पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाविरुद्ध गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला . या सामन्यात उपकर्णधार शादाब खान खेळत नसल्याचे त्याने नाणेफेकीदरम्यान सांगितले. शादाबच्या जागी उसामा मीरला संधी देण्यात आली. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाने एकही बदल केलेला नाही.
सलामीवीर फलंदाज डेव्हिड वॉर्नर याच्या शानदार दीडशतकी आणि मिचेल मार्शच्या दमदार शतकी खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने टाॅस गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 9 बाद 367 धावा केल्या आहेत. पाकिस्तानला विजयासाठी 368 धावांचे लक्ष्य मिळालं आहे.
Australia finish on 9-367 after centuries to Mitch Marsh and David Warner #CWC23
— cricket.com.au (@cricketcomau) October 20, 2023
ऑस्ट्रेलियाकडून दोन्ही सलामीवीर फलंदाजांनी शतके झळकावली. डेव्हिड वॉर्नरने 163 आणि मिचेल मार्शने 121 धावा केल्या. मार्शने 108 चेंडूत 121 धावा केल्या. यादरम्यान त्याने 10 चौकार आणि 9 षटकार मारले. वाॅर्नर 124 चेंडूत 163 धावा करून बाद झाला. त्याने 14 चौकार आणि नऊ षटकार मारले. या दोघांशिवाय अन्य कोणत्याही फलंदाजाला 25 धावांचा पल्ला गाठता आला नाही.
मार्कस स्टॉइनिसने 21 धावा केल्या. जोश इंग्लिशने 13 धावांचे योगदान दिले. मार्नस लॅबुशेन आठ धावा करून बाद झाला तर स्टीव्ह स्मिथ सात धावा करून बाद झाला. पॅट कमिन्सने सहा आणि मिचेल स्टार्कने दोन धावा केल्या. ग्लेन मॅक्सवेल आणि जोश हेझलवूड खातेही उघडू शकले नाहीत. एडन झाम्पा 1 धाव काढून नाबाद राहिला.
पाकिस्तानकडून शाहीन आफ्रिदीने 10 षटकात 54 धावा देताना सर्वाधिक 5 बळी घेतले. आफ्रिदीने मिचेल मार्श,ग्लेन मॅक्सवेल,मार्कस स्टॉइनिस, मिचेल स्टार्क आणि जोश हेझलवूड यांना बाद केलं. हरिस रौफने तीन गडी बाद केले मात्र त्याने 8 षटकात 83 धावा दिल्या. उसामा मीरनेही एक विकेट घेतली मात्र त्याने 9 षटकात 82 धावा दिल्या.
वॉर्नर पॅव्हेलियनमध्ये परतला….
डेव्हिड वॉर्नरचा डाव अखेर संपुष्टात आला. तो 163 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. 43व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर वॉर्नर हारिस रौफचा बळी ठरला. बदली क्षेत्ररक्षक शादाब खानने त्याचा झेल घेतला. 124 चेंडूत 163 धावा करून वॉर्नर बाद झाला. त्याने 14 चौकार आणि नऊ षटकार मारले.
स्मिथ अयशस्वी…
या सामन्यात अनुभवी फलंदाज स्टीव्ह स्मिथची बॅट चालली नाही. तो नऊ चेंडूत सात धावा करून बाद झाला. स्मिथला उसामा मीरने स्वत:च्या गोंलदाजीवर झेलबाद करत पव्हेलियनमध्ये पाठवले.
दोन्ही सलामीवीरांनी झळकावली शतके…
पाकिस्तानविरुद्ध ऑस्ट्रेलियाने दमदार सुरुवात केली आहे. ऑस्ट्रेलियाचे सलामीवीर फलंदाज डेव्हिड वॉर्नर आणि मिचेल मार्श यांनी पाकिस्तानविरुद्ध आपापली शतके पूर्ण केली. वॉर्नरने 31व्या षटकात मोहम्मद नवाजच्या चेंडूवर एक धाव घेत आपले शतक पूर्ण केले तर मिचेल मार्शने पुढच्याच चेंडूवर चौकार मारून शतक झळकावले. वॉर्नरचे हे एकदिवसीय क्रिकेटमधील 21 वे शतक आहे तर मार्शचे हे दुसरे शतक आहे. विश्वचषकाच्या इतिहासात ऑस्ट्रेलियाकडून पहिल्यांदाच दोन्ही सलामीवीरांनी एकाच सामन्यात शतकी खेळी खेळली आहे.
AUS vs PAK : दोन्ही संघांचे Playing-11
पाकिस्तान : अब्दुल्ला शफीक, इमाम उल हक, बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), सौद शकील, इफ्तिखार अहमद, मोहम्मद नवाज, उसामा मीर, हसन अली, शाहीन आफ्रिदी, हरिस रौफ.
ऑस्ट्रेलिया : डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, स्टीव्ह स्मिथ, मार्नस लॅबुशेन, जोश इंग्लिश (विकेटकीपर), ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉइनिस, पॅट कमिन्स (कर्णधार), मिचेल स्टार्क, अॅडम झाम्पा, जोश हेझलवूड.