लंडन : जगभरातील इंग्रजी भाषेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आदराचे स्थान असणारा ब्रिटीश लेखक शेक्सपिअर यांचे महत्त्वाचे नाटक असलेले हॅम्लेट ही साहित्यकृती लवकरच शैक्षणिक अभ्यासक्रमाच्या बाहेर जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे. ब्रिटिश ओपन युनिवर्सिटीने दिलेल्या संकेताप्रमाणे शेक्सपिअरच्या हॅम्लेट आणि इतर काही साहित्यकृतींवर अभ्यासक्रमात बंदी घालण्यात येणार आहे.
काही विशिष्ट साहित्यकृतींचा अभ्यास केल्यानंतर विद्यार्थ्यांच्या मनात नैराश्य आणि कट्टरवादी विचार येत असल्याचा अहवाल ओपन युनिव्हर्सिटीचा एका संशोधक कमिटीने दिला असल्याने शेक्सपियर व्यतिरिक्त आणखीन काही लेखकांच्या कलाकृतींवर बंधने येण्याची शक्यता आहे. शेक्सपिअरच्या हॅम्लेट व्यतिरीक्त जोनाथन स्विफ्ट या लेखकाचे गलिवर ट्रॅव्हल्स आणि जैन ऑस्टिन यांचे परसिवेशन या महत्त्वाच्या साहित्यकृती सुद्धा आता अभ्यासक्रमाच्या बाहेर राहण्याची शक्यता आहे.
अभ्यास मंडळाच्या सदस्यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे या तीनही साहित्यकृती मधील काही प्रकरणांमध्ये नकारात्मक विचार ठासून भरले आहेत त्यांचा विद्यार्थ्यांच्या मनावर परिणाम होत आहे. ब्रिटीश ओपन युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांना नजीकच्या काळात शेक्सपिअर जोनाथन स्विफ्ट किंवा जेन ऑस्टिन यांच्या साहित्यकृती अभ्यासता येणार नाहीत. अभ्यास मंडळाच्या नव्या निर्णयाप्रमाणे सध्या या सर्व साहित्यकृतींच्या पहिल्या पानांवर एक इशारा देण्यात येणार आहे. हे पुस्तक वाचून मानसिक आरोग्य बिघडू शकते अशा आशयाचा हा इशारा असणार आहे तर या निर्णयाची पुढील पायरी म्हणून या तीनही साहित्यकृतींना अभ्यासक्रमाच्या बाहेर काढले जाण्याचे संकेत मिळत आहेत.
याशिवाय शेक्सपिअरचा आणखीन एक नाटक जुलियस सीझर आणि अरेबियन नाईट या पुस्तकांच्या पहिल्या पानावरही वैधानिक इशारा प्रकाशित करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांनीच नकारात्मक विचार तयार होत असल्याची तक्रार ब्रिटिश ओपन यूनिवर्सिटीकडे केल्यानंतर अभ्यास मंडळाने त्याचा विचार केला आणि त्यानंतरच ह्या साहित्यकृतींवर बंदी घालण्याचा विचार सुरू झाला अशी माहितीही देण्यात आली आहे. ओपन युनिव्हर्सिटीच्या या निर्णयावर काही तज्ज्ञांनी मात्र टीकास्त्र सोडले आहे. अशा प्रकारच्या निर्णयामुळे विद्यार्थी अनमोल आणि अभिजात असे साहित्य वाचण्यापासून वंचित राहू शकतात असे टीकाकारांनी म्हटले आहे.