लॉकडाऊनपूर्वी खरेदीसाठी दुकानांमध्ये नागरिकांची झुंबड
पिंपरी (प्रतिनिधी) – करोनाला रोखण्यासाठी गर्दी कमी व्हावी म्हणून पिंपरी-चिंचवड शहरात सोमवार (दि. 13) मध्यरात्रीपासून लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. परंतु लॉकडाऊनची घोषणा झाल्याने शुक्रवार सायंकाळपासूनच बाजारात गर्दी उसळत आहे. शनिवारी दिवसभर शहरात खूप मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून आली. तब्बल साडे तीन महिन्यांनंतर शहरात एवढ्या मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून आली. शहर आणि उपनगरांमधील सर्व रस्ते गर्दीने फुल्ल झाले होते. तसेच पुन्हा एकदा किराणा आणि दारुच्या दुकानासमोर नागरिकांच्या रांगा लागल्या होत्या.
अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली असताना करोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने पुणे व पिंपरी-चिंचवडमध्ये सोमवारी मध्यरात्रीपासून पुन्हा दहा दिवसांचा लॉकडाऊन होणार आहे. त्यानुसार 14 ते 18 जुलैच्या कालावधीत कडक लॉकडाऊन असेल. या कालावधीत औषधे, दूध, रुग्णालये आणि अत्यावश्यक सेवा सुरू राहतील. त्यामुळे नागरिकांनी वस्तूंचा साठा करण्यास सुरुवात केली आहे. आज शहरातील विविध भागांतील बाजारपेठांमध्ये नागरिकांनी धान्य, किराणा साहित्य, गृहोपयोगी वस्तू आदींच्या खरेदीसाठी एकच गर्दी केली होती. आवश्यक साहित्य खरेदीसाठी नागरिक सकाळपासूनच घराबाहेर पडले होते. किराणा दुकानांसमोर रांगा लावून किराणा साहित्याची खरेदी केली जात होती. त्याशिवाय, पुढील आठवडाभर पुरेल एवढा भाजीपाला खरेदी करण्याकडे देखील गृहिणींचा कल पाहण्यास मिळाला. लॉकडाऊन सुरू होण्यास दोन दिवसांचा अवधी असल्याने मोठी गर्दी झाली होती.
वस्तू महागल्या आणि संपल्याही
पुन्हा एकदा ग्राहकांची गर्दी झाल्याने व्यावसायिकांनी याचा फायदा घेत अनेक वस्तुंच्या किंमती पुन्हा एकदा वाढविल्या. वस्तूंचा साठा करण्यासाठी सर्वच नागरिक बाहेर पडल्याने अनेक किराणा दुकानांमधील काही आवश्यक किराणा वस्तू संपल्या होत्या. दुकानदारदेखील तातडीने माल मागवून घेऊन ग्राहकांना थोड्या वेळाने येऊन घेऊन जाण्यास सांगत होते. बहुतेक कामगार वर्गाचा सात ते दहा तारखेदरम्यान पगार होतो, यामुळे नागरिकांनी मोठ्या प्रमाणात खरेदीसाठी गर्दी केली होती. व्यावसायिकांनी सांगितले की, पहिल्या लॉकडाऊननंतर आता पुन्हा अशाच प्रकारची गर्दी पहायला मिळाली. दिवाळीत होते इतकी उलाढाल लॉकडाऊनच्या पहिल्या टप्प्यात आणि गेल्या दोन दिवसात झाल्याचेही त्यांनी सांगितले.