लातूर – बालविवाह हा कायद्याने गुन्हा असतानाही एका 15 वर्षीय मुलीचा विवाह 28 वर्षांच्या तरुणासोबत लावून दिल्याची घटना लातुर जिल्ह्यातील मुरुड परिसरात समोर आली आहे. याप्रकरणी मुरूड पोलिस ठाण्यात सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये पीडित मुलीचे आई-वडिल, नवरदेव, सासू-सासरे, भटजी, मंडप डेकोरेशनवाला यांचा समावेश आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, निलंगा तालुक्यातील औराद शहाजानी येथील 15 वर्षीय मुलीचा गुंफावाडी (ता. लातूर) येथील 28 वर्षीय तरुणासोबत 25 मार्च 2022 रोजी बालविवाह झाल्याची तक्रार चाईल्ड लाईनच्या 1098 या हेल्पलाईनवर करण्यात आली होती. या तक्रारिच्या आधारे चाईल्डलाईनच्या वतीने सदर घटनेची माहिती जिल्हा महिला व बालविकास विभागास देण्यात आली. त्यानुसार जिल्हा महिला व बालविकास विभाग आणि लातूर चाईल्ड लाईनच्या वतीने संयुक्त करण्यात आली.
पथकाने तक्रारीत नमुद करण्यात आलेल्या मुलीची भेट घेतली असता तिच्या गळ्यात मंगळसूत्र आणि पायात जोडवे आढळून आले. तिच्या वयासंदर्भात शाळेचा दाखला तपासला असता ती 15 वर्षे 10 महिण्यांची असल्याचे निदर्शनास आले. पोलिसात तक्रार देण्यात आली. त्यानंतर मुलीचे आई-वडिल, नवरदेव, सासू, सासऱ्यासह लग्न लावणारा भटजी आणि मंडप डेकोरेशनवाला अशा 7 जणांविरुध्द मुरुड पोलिसांत बालविवाह प्रतिबंधक अधिनियम 2006 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.