पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – अभिनेता सलमान खान याच्या मुंबईतील घरावर झालेल्या गोळीबाराच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर पुण्यात आर्म ऍक्टचे गुन्हे दाखल असणाऱ्या गुन्हेगारांची पोलीस आयुक्तालयात झाडाझडती घेण्यात आली, तसेच पोलीस अधिकाऱ्यांना शहरात गोळीबाराच्या घटना कमी झाल्या पाहिजे, अशी सक्त ताकीद दिली.
पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या आदेशाने मंगळवारी आर्म ॲक्टचे गुन्हे दाखल होणाऱ्यांची परेड घेण्यात आली. यापूर्वीही पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी शहरातील सराइत गुन्हेगार, अंमली पदार्थ विक्रेते यांना अशाच प्रकारे बोलावून तंबी दिली होती. रविवारी अभिनेता सलमान खान याच्या घराबाहेर गोळीबार करण्यात आला होता.
या पार्श्वभूमीवर शहरात मागील ५ वर्षांत आर्म ऍक्टनुसार गुन्हे दाखल असलेल्या ६१४ गुन्हेगारांपैकी १५० ते २०० जणांना पोलीस आयुक्तलयात बोलावण्यात आले होते. या वेळी या गुन्हेगारांकडून डोजिअर फॉर्म देखील भरून घेण्यात आला. या वेळी गुन्हेगारांना सूचना देण्यात आल्या, की शहरात कुठेही गोळीबाराची घटना झाली नाही पाहिजे.
याचबरोबर जर कोणी बेकादेशीरपणे पिस्तूल घेऊन फिरत असेल, तर त्याची ‘टिप’ पोलिसांना द्यावी. तुमचे नाव गुप्त ठेवण्यात येईल. आर्म ऍक्टनुसार गुन्हा दाखल असणाऱ्या गुन्हेगारांवर लक्ष ठेवण्याच्या सूचना पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी गुन्हे शाखेला दिल्या आहेत.
अभिनेता सलमान खानच्या घरावर करण्यात आलेल्या गोळीबाराच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील आर्म ऍक्टनुसार गुन्हा दाखल असणाऱ्या गुन्हेगारांना आयुक्तालयात बोलावून सक्त ताकीद दिली आहे. जर कोणी बेकादेशीरपणे पिस्तूल घेऊन फिरत असेल किंवा कोणाकडे पिस्तूल असेल, तर त्यांची माहिती पोलिसांना द्यावी. माहिती देणाराचे नाव गुप्त ठेवण्यात येईल.- अमितेश कुमार पोलीस आयुक्त, पुणे शहर