पुणे – परस्पर संमतीने घटस्फोटासाठी अर्ज दाखल केल्यानंतर अधिक पैसे मिळवण्यासाठी दबाव आणून पतीने संमती घेतल्याचा खोटा बहाणा करणाऱ्या पत्नीला न्यायालयाने दणका दिला आहे. घटस्फोटाचा अर्ज मंजुर केला आहे. पत्नीने संमती काढून घेतल्यानंतर पतीला मात्र घटस्फोटासाठी दहा वर्षे संघर्ष करावा लागला. त्यानंतर न्याय मिळाला आहे. 2013 मध्ये दाखल झालेला दावा 2023 मध्ये निकाली निघाला. वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायाधीश के.एस.नावंदर यांच्या न्यायालयात हा निकाल झाला.
राजा आणि राणी (नावे बदलली आहेत) अशी दोघांची नावे आहेत. पतीच्या वतीने ऍड. लीना आदेश शहा यांनी न्यायालयात बाजू मांडली. दोघांनी मार्च 2013 मध्ये परस्पर संमतीने घटस्फोटासाठी अर्ज केला. नियमानुसार अर्ज केल्यानंतर सहा महिने थांबावे लागते. सहा महिने पूर्ण होण्यास काही दिवसच बाकी असताना दबाव टाकून संमती घेतल्याची भूमिका पत्नीने घेतली. तसा न्यायालयात अर्ज केला. पतीचे आकुर्डी येथे दुकान होते. ते त्याने स्वकमाईने घेतले होते.
त्या दुकानाची विक्री 27 लाख रुपयांना केली. त्यापैकी सहा लाख रुपये तीन मुलांच्या नावावर ठेवण्यात आले आहेत. तर उर्वरित 21 रुपये तिच्या खात्यात भरण्यात आले आहेत. घटस्फोटाला सहमती दर्शविताना ही रक्कम घेतल्याचेही पतीच्या वकिलांनी न्यायालयात दाखवून दिले. तर दबावाने सहमती घेतल्याचे ती सिध्द करू शकली नाही. त्यामुळे तिचा अर्ज टिकला नाही. न्यायालयाने घटस्फोटाचा अर्ज मंजुर केला.
कायदे महिलांच्या बाजूने आहेत. कौटुंबिक दाव्यात नेहमीच महिलांच्या बाजूने निकाल लागतो, असा अनेकांचा समज आहे. मात्र, या परस्पर संमतीच्या घटस्फोटाच्या दाव्यात तिने जास्त पैसे उकळण्यासाठी प्रयत्न करत संमती काढून घेतली. तरीही न्यायदेवतेने पतीच्या बाजूने निकाल दिला. त्याला न्याय दिला. हे ऐतिहासिक आहे.
ऍड.लीना आदेश शहा, पतीच्या वकील