जिनिव्हा: काही देशांत तरुणांच्या बेजबाबदारपणामुळे करोनाची साथ पसरत आहे, असे निरीक्षण जागतिक आरोग्य संघटनेने नोंदवले आहे.
जिनिव्हामधून व्हर्चुअल पत्रकार परिषदेत बोलताना संघटनेचे प्रमुख टेड्रोस घेब्रेयेसुस म्हणाले, तरुणांनाही करोनाचा धोका आहेच. त्यांनीही अन्य व्यक्तींप्रमाणे काळजी घ्यायला हवी. मात्र तरूण अशी काळजी पुरेशा प्रमाणात घेत नसल्याने काही देशांत बाधित संख्या वेगाने वाढताना दिसत आहे.
तरूणांनी या परिस्थितीत नेतृत्व करून करोनाला पराभूत करण्यासाठी सर्व त्या उपाय योजना करण्याची गरज आहे. त्यांच्यात ती क्षमता नक्कीच आहे. या साथीच्या धोक्याची जाणीव तरूणांना करून देणे हे करोनाची साथ रोखण्यातील महत्वाचे आव्हान आहे, असे ते म्हणाले.
ही साथ आली म्हणजे आयुष्य संपत नाही. आम्हाला या विषाणूंसोबत जगायला शिकले पाहिजे. आपला जीव वाचवण्यासाठी योग्य पावले उचलली पाहिजेत. करोनाचा धोका सार्वाधिक असणाऱ्या गटांने तर स्वत:ला वाचवले पाहिजे, असे ते म्हणाले.
करोनाचा धोका कमी करण्यात आपल्या सर्वांचाच सहभाग अपेक्षित आहे. दररोज आपण स्वत: आणि अजूबाजूंच्या व्यक्तीच्या आरोग्याचा विचार केला पाहिजे. आपल्या आरोग्याबाबत विश्वासार्ह माहिती उपलब्ध होणे अत्यंत आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले.