नागपूर: नागपूरमध्ये करोना काळातही लोकप्रतिनिधींकडून राजकारण सुरू असल्याचे दिसून येत आहे. नागपूरमधील लॉकडाऊनबाबत निर्णय घेण्यासाठी महापौर संदीप जोशी आणि पालकमंत्री नितीन राऊत यांनी दोन स्वतंत्र बैठका घेतल्या. तरीही लॉकडाऊन हा पर्याय नाही, असा समान निर्णय दोन्ही बैठकांमध्ये घेण्यात आला.
या दोन्ही बैठकांमध्ये लोकप्रतिनिधींनी लॉकडाऊनला विरोध दर्शविला आहे. प्रशासनाने जबरदस्तीने लॉकडाऊन केल्यास लोकप्रतिनिधी रस्त्यावर उतरतील, असा इशारा नागपूरचे महापौर संदीप जोशी यांनी दिला.
आयुक्तांनी महापौरांच्या बैठकीला उपस्थित राहू शकणार नाही, हे न कळवणे अशोभनीय आहे. तसेच आमची बैठक आधीच ठरली असताना पालकमंत्र्यांनीही आजच बैठक आयोजित केली. या पद्धतीचं घाणेरडं राजकारण होत असल्याचेही जोशी म्हणाले.
दुसरीकडे पालकमंत्री आणि कॉंग्रेस नेते नितीन राऊत यांनीही बैठक बोलावली. या बैठकीलाही त्याच अधिकाऱ्यांना बोलावण्यात आले होते.
विशेष म्हणजे दोन्ही बैठका दोन वेगवेगळ्या ठिकाणी पण एकाच वेळेला झाल्या. नितीन राऊत म्हणाले, नागपुरातील परिस्थिती हाताबाहेर गेली नाही. नागपूरमध्ये लॉकडाऊन हा पर्याय नाही.
लॉकडाऊनमुळे आर्थिक फटका बसणार आहे, त्यामुळे लॉकडाऊन न करता इतर पर्याय शोधण्याचं काम आम्ही करत आहोत. येत्या काळात कोव्हिड रुग्णालयात आलेल्या प्रत्येक संशयितांच्या रॅपिड अँटीजेन टेस्ट करणार, असेही नितीन राऊत म्हणाले.