नवी दिल्ली: करोना प्रसाराचा वेग मंदावला असल्याच्या दिलासाजनक बातम्या गेल्या आठवड्यात आरोग्य मंत्रालयातर्फे देण्यात आल्या होत्या. मात्र मे महिन्याच्या पहिल्या आठवड्याचा आढावा घेतला तर चित्र काहीसे विचलीत करणारे असून करोनाचा प्रसार होण्याचा जो वेग आहे, तो हादरवणारा असल्याचे निदर्शनास येत आहे. 1 मे ते 5 मे या पहिल्या पाचच दिवसांत करोनाची लागण झालेले नवे 13106 रुग्ण समोर आले आहेत.
केंद्र सरकारने आज सकाळी जारी केलेल्या आकडेवारीनुसार देशभरातील एकूण रूग्णांची मंगळवारी सकाळपर्यंतची संख्या 46433 होती. यात बरे झालेल्यांची संख्या 12727 आहे. तर 1568 रूग्णांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. गेल्या 24 तासांतच देशभरात 195 जण मृत्यूमुखी पडले असून लागण झालेल्यांची संख्या 3900 वाढली आहे. 1 ते 5 मे या काळातील एकूण मृतांची संख्या साधारण 500 च्या घरात जाते आहे. गेल्या महिन्याच्या याच पहिल्या पाच दिवसांत आताच्या 13 हजाराच्या तुलनेत केवळ 2201 नवे रूग्ण आढळून आले होते. यावरून करोनाचा वेग वाढतोय का, अशी शंका निर्माण झाली आहे.
महाराष्ट्र, गुजरात धोकादायक
राज्यांच्या संदर्भात बोलायचे झाले तर मंगळवार सकाळपर्यंत महाराष्ट्रातील करोनाबाधितांनी साडेचौदा हजारांचा आकडा ओलांडला होता. गेल्या 24 तसांतच 1567 नवे रुग्ण आढळून आले असून 35 जणांचा मृत्यू झाला आहे. गुजरातबाबत बोलायचे झाले तर येथील रुग्णांची संख्या 5804 झाली आहे. गेल्या चोवीस तासांत 376 नवे रूग्ण आढळले असून मृतांची संख्या 29 झाली आहे.