शांघाय – चीनमधील शांघाय शहरामध्ये करोनाच्या रुग्णांची संख्या नव्याने वाढायला लागली आहे. तसेच अन्य काही शहरांमध्येही करोनाच्या संसर्गाचा फैलाव व्हायला लागल्याने आता नव्याने निर्बंध लावायला सुरुवात करण्यात आली आहे.
झेंगझाऊ इकॉनॉमिक झोन या चीनमधील मध्यवर्ती औद्योगिक क्षेत्रामध्ये 14 दिवसांच्या लॉकडाऊनची अंमलबजावणी साथीच्या सद्यस्थितीनुसार करण्यात येणार आहे. वायव्य चीनमधील शियान शहरामध्ये प्रशासनाने नागरिकांनी कारणाशिवाय आपल्या घराच्या परिसराबाहेर जाऊ नये असे आवाहन केले आहे. कंपन्यांनीही आपल्या कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याची मुभा द्यावी किंवा कामाच्या ठिकाणीच रहाण्याची व्यवस्था करावी, असेही प्रशासनाने म्हटले आहे.
शांघायजवळच्या सुजाऊ शहरात प्रशासनाने ज्यांना घरून काम करणे शक्य असेल, त्यांनी तसे करावे, अशी सूचना दिली आहे.
शांघाय शहरामध्ये शुक्रवारी साडे 3 हजार नवीन रुग्ण नोंदवले गेले. त्याचबरोबर 19 हजार 500 जणांच्या चाचण्याही पॉझिटिव्ह आल्या आहेत. काही दिवसांपासून शांघायमध्ये लक्षणे न आढळणारे परंतू चाचणी पॉझिटिव्ह येणाऱ्यांची संख्या वाढते आहे.