पिंपरी (प्रतिनिधी) – गेल्या 74 दिवसांपासून शहरात ठाण मांडून बसलेल्या “करोना’ने आता उग्र रूप धारण करण्यास सुरुवात केली आहे. शनिवारी आतापर्यंतचा उच्चांक गाठत “करोना’ने 50 जणांना बाधित केले. त्यापैकी 46 रुग्ण हे शहरातील असून 4 रुग्ण शहराबाहेरील आहेत. त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहरात एकूण “करोनाबाधितां’चा आकडा 311 वर जाऊन पोहोचला आहे.
शनिवारी सायंकाळी हाती आलेल्या अहवालानुसार शहरातील 29 पुरुष आणि 17 स्त्रियांना “करोना’ची लागण झाली आहे. शनिवारी पॉझिटिव्ह आढळलेले 46 रुग्ण हे चिंचवड स्टेशन, पिंपरी, वाकड, भोसरी, वडमुखवाडी या परिसरातील आहेत. आज पॉझिटिव्ह आलेल्या एकूण रुग्णांपैकी तब्बल 26 रुग्ण हे चिंचवड स्टेशन येथील आनंदनगर भागातील आहेत. यामुळे आनंदनगर हा परिसर शहरातील “करोना’चे सर्वांत मोठे हॉटस्पॉट ठरत आहे. तसेच भवानी पेठ, नाना पेठ, येरवडा व खडकी येथील चार रुग्णांनाही “करोना’ची बाधा झाली आहे.
इंदिरानगर, चिंचवड, आकुर्डी, चऱ्होली व थेरगाव येथील 9 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. “करोना’चा आकडा वाढत असताना “करोनामुक्त’ होत असलेल्या रुग्णांची संख्याही वाढत होती. यामुळे उपचाराधीन रुग्णांची संख्या आटोक्यात होती. परंतु गेल्या सात दिवसांतच “करोना’चे नवे सुमारे शंभर रुग्ण आढळल्याने पहिल्यांदाच शहरातील उपचाराधीन रुग्णांची संख्या 135 वर जाऊन पोहोचली आहे. तसेच शहराबाहेरील 24 रुग्ण पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या रुग्णालयात उपचार घेत आहेत.
“लॉकडाऊन’च्या नियमांचे पालन न करणे आता शहराला चांगलेच महागात पडत आहे. “करोना’ची लागण झालेल्या आतापर्यंतच्या एकूण रुग्णांमध्ये 42 टक्के तरुण, 23 टक्के प्रौढ नागरिक आहेत. यांच्यामुळे लहान आणि किशोरवयीन मुलांनादेखील “करोना’ची लागण झाली असून त्यांचे प्रमाण जवळपास 26 टक्के आहे. ज्यांना सर्वाधिक “करोना’चा धोका असतो अशा ज्येष्ठ नागरिकांचे एकूण रुग्णांमध्ये प्रमाण केवळ 9 टक्के इतके आहे.
“करोना’योद्ध्यांनाही बाधा
“करोना’सोबत दोन-दोन हात करत असलेल्या योद्ध्यांनाही आता “करोना’ची लागण होऊ लागली आहे. शनिवारी आलेल्या अहवालांमध्ये डॉक्टर, नर्स आणि पोलीस कर्मचाऱ्याला देखील करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. रुग्णांना करोनातून मुक्त करण्यासाठी झटणाऱ्या वायसीएममधील एका डॉक्टर आणि परिचारिकेला लागण झाल्याचे आज आलेल्या अहवालात स्पष्ट झाले. त्याशिवाय, एका पोलीस अधिकाऱ्याला देखील करोनाची लागण झाली असल्याची माहिती महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील यांनी दिली.
तळेगाव दाभाडे येथील एकाला करोनाची लागण
सांगवी फाटा येथील जिल्हा रुग्णालयात आज 40 वर्षीय पुरुषाचा करोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला. तळेगाव दाभाडे-संभाजीनगर येथील हा रुग्ण आहे. रुग्णालयात आज नव्याने 18 करोना संशयित रुग्णांना उपचारासाठी दाखल करून घेण्यात आले. त्यामध्ये पुणे महापालिका हद्दीतील 7, पिंपरी-चिंचवडमधील 5 तर, पुणे ग्रामीण क्षेत्रातील 6 जणांचा समावेश आहे. रुग्णालयात सध्या 22 जणांवर उपचार सुरू असून त्यातील 10 जण अत्यवस्थ आहेत. 51 जणांना उपचार करून घरी सोडण्यात आले आहे.