बीजिंग: चीनने वुहान शहरातील करोनाची लागण नियंत्रणात आणल्यानंतर आता चीनच्या रशिया सीमेकडील भागात करोनाची लागण झाल्याचे आढळून आल्याने प्रशासनाची मोठीच धावपळ सुरू झाली आहे. हा भाग सील करून तेथे इमर्जन्सी मेडिकल युनिट उभारण्यात आली आहेत. हेईलॉंगजीयांग प्रांतात हा प्रादुर्भाव झाला आहे.
हा भाग रशियाच्या सीमेलगत येतो आणि चीनची रशियात मोठी गुंतवणूक आहे. तेथे कामाला असलेले बरेच जण या मार्गाचा वापर करून पुढे चीनमध्ये येतात. त्यामुळे एन्ट्री पॉईन्टलाच हा हॉटस्पॉट तयार झाल्यानी चीनी प्रशासनाचे धाबे दणाणले आहे. सोमवारी रात्री चीनने या भागात फिल्ड हॉस्पिटल उभारले. तेथे ज्या पेशंटची तपासणी करण्यात आली त्यातील अनेकांना करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. येथे दररोज एक हजार जणांची चाचणी करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
या भागात करोनाचे किमान एक हजार रूग्ण आढळून आल्याची माहिती आहे. त्यातील किमान निम्मे लोक रशियातून चीनमध्ये आलेल्यांपैकी आहेत. या भागातील सुईफेन्हे हे गाव यातील हॉटस्पॉट बनले आहे. तेथे आमची अजूनही पुरेशी वैद्यकीय सुविधा उपलब्ध नाही असे चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगाचे तज्ज्ञ वॅंग बिन यांनी सांगितले. हा भाग बीजिंगपासून आठशे किमी अंतरावर आहे. तो अतिशय दुर्गम भाग म्हणून ओळखला जातो आणि तो कायम बर्फाच्छादित असतो. आता रशियानेही या भागातून त्यांच्या देशात येणाऱ्यांसाठी कडक निर्बंध लागू केले आहेत. चीन सरकारने आपल्या नागरिकांना सीमा भागात जाऊ नका अशी सूचना जारी केली आहे.