राजगुरूनगर : लॉकडाऊनचे नियम मोडणाऱ्या शहरातील तीन दुकानदारांना तसेच,मास्क न घालता फिरणाऱ्या दोन व्यक्तींना खेड प्रथमवर्ग न्याय दंडाधिकारी यांनी प्रत्येकी एक हजार दंड ठोठावला आहे. तर, दंडाची रक्कम न भरल्यास एक महिना कारावासाची शिक्षा सुनावली आहे.
देशातील लॉकडाऊनचे उल्लंघन करणाऱ्यांना शिक्षा झाल्याने नागरिकांमध्ये चर्चेला उधाण आले आहे. या शिक्षेची जरब शहरात चांगलीच बसली आहे.
याबाबत खेड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरविंद चौधरी यांनी दिलेली माहिती अशी कि, देशात लॉकडाऊन झाल्यानंतर राजगुरूनगर शहरात त्याची कडक अंमलबजावणी केली जात असताना मॉल, डेअरी, सुपर मार्केट सुरु ठेवून काही जणांनी सोशल डिस्टंस पाळत नव्हते.
करोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असताना येथील काही दुकानदार शासकीय नियमांचे उल्लंघन करत असल्याचे दिसून आले. पोलिसांनी काल १४ एप्रिल रोजी राजगुरूनगर शहरातील वाडा रोड वरील श्री मार्ट, पाबळ रोड वरील वाघेश्वर डेअरी, चांडोली फाट्यावरील मानकृपा सुपर मार्केट या तीन दुकानांवर व गर्दीत मास्क न घालता फिरणाऱ्या दोघांवर भादंवि कलम १८८ नुसार खेड पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.
त्यांचे चार्जशीट खेड पोलिसांनी आज येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी डी. बी. पतंगे यांच्याकडे आज सादर केले. त्याचा निकाल आजच खेड दंडाधिकारी डी बी पतंगे यांनी दिला. लॉकडाऊनचे पालन न करणारे तीन दुकानदार व मास्क न लावता शहरातून फिरणाऱ्या दोन व्यक्तींना न्यायालयाने एक हजार रुपये दंड व दंड न भरल्यास एक महिना कारावास अशी शिक्षा सुनावली.
या निकालाची चर्चा सगळीकडे वाऱ्यासारखी पसरताच अनेक जणांनी मास्क खरेदीसाठी मेडिकल मध्ये गर्दी केली. तर दुकानरांकडून सोशल डिस्टंस ठेवण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्यात येत आहे. मास्क न लावता आलेल्या ग्राहकाला वापस पाठवण्यात येत तर, जो ग्राहक डिस्टंस पाळत नाही त्याला वस्तू दिल्या जात नाहीत.
याबाबत पोलीस निरीक्षक अरविंद चौधरी यांनी सांगितले कि, जे दुकानदार नियम पाळणार नाहीत त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जातील. तशेच नागरिकांनी घरातून बाहेर पडू नये पडल्यास तोंडाला मास्क लावणे बंधनकारक आहे. मास्क न लावणारे आणि सार्वजनिक ठिकाणी कोणी थुंकल्यास गुन्हा दाखल केला जाईल. व्यापारी वर्गाला सूचना देण्यात आल्या असून सोशल डिस्टन्सची अंमलबजावणी न करणाऱ्या दुकानदारावर तात्काळ गुन्हे दाखल केले जातील.