Corona vaccine : कोव्हॅक्‍सिन भारत अन्‌ ब्रिटनच्या स्टेनवर प्रभावी

नवी दिल्ली – भारत बायोटेकची कोरोना प्रतिबंधक लस कोवॅक्‍सिन भारत आणि ब्रिटनमध्ये आढळलेल्या कोरोना व्हायरसच्या नव्या स्ट्रेनवर प्रभावी असल्याचे दिसून आले आहे, अशी माहिती कंपनीच्या वतीने आज देण्यात आली.

हैदराबादस्थित लस उत्पादक भारत बायोटेकने प्रख्यात मेडिकल जर्नलमधील प्रकाशित संशोधनाचा हवाला देत सांगितले की, कोरोना लसीकरणादरम्यान भारत आणि ब्रिटनमधील अनुक्रमे इ.1.617 आणि इ.1.1.7 सह कोरोनाच्या सर्व प्रमुख स्ट्रेनवर प्रभावी आहे हे सिद्ध झाले आहे.

कंपनीच्या म्हणण्यानुसार हे संशोधन नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी आणि इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले.

भारत बायोटेकचे सह-संस्थापक आणि संयुक्त व्यवस्थापकीय संचालक सुचित्रा इला यांनी एका ट्‌विटमध्ये म्हटले आहे की, ‘कोवॅक्‍सिनला पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय पातळीवर मान्यता मिळाली आहे, प्रकाशित वैज्ञानिक संशोधन आकडेवारीही ही लस नवीन स्ट्रेनवर प्रभावी असल्याचे दर्शवते. त्यांनी पंतप्रधान कार्यालयासह अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि केंद्रीय आरोग्यमंत्री हर्ष वर्धन यांच्यासह काहींना ट्‌वीटमध्ये टॅग केले आहे.

देशात सुरु असलेल्या लसीकरण मोहिमेत कोवॅक्‍सिन लस महत्त्वाची भूमिका निभावत आहे. कोवॅक्‍सिन ही एक पूर्णपणे स्वदेशी लस आहे. या व्यतिरिक्त लसीकरण मोहिमेत सीरम इन्स्टिट्युट ऑफ इंडियाच्या कोविशील्ड लसीचाही वापर केला जात आहे.

केंद्र सरकारकडून 20 कोटी डोसचं वितरण
भारत सरकारने आतापर्यंत राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना लसींचे विनामूल्य 20 कोटी 28 लाख 09 हजार 250 डोस दिले आहेत. यापैकी 14 मे 2021 पर्यंतच्या वाया गेलेल्या डोससह एकूण 18 कोटी 43 लाख 67 हजार 772 डोस दिले आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.