पिंपरी – करोना महामारीच्या काळात नियमाचे उल्लंघन करणाऱ्या नागरिक व दुकानदारांवर महापालिकेच्या पथकाकडून कारवाई केली जात आहे. आतापर्यंत तब्बल 89 हजार 338 बेशिस्त नागरिकांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यामधून एकूण 4 कोटी 83 लाख 31 हजार 916 रूपयांचा दंड महापालिकेच्या तिजोरीत जमा झाला आहे.
पालिकेच्या आरोग्य विभागाच्या 8 क्षेत्रीय कार्यालयनिहाय पथके, कोविड मार्शल आणि पोलिसांच्या मदतीने बेशिस्त नागरिक, दुकानदार व विक्रेत्यांवर कारवाई केली जात आहे. विशेषत: बाजारपेठा, भाजी मंडई, चौक असा वर्दळीच्या ठिकाणी ही कारवाई होत आहे.
रस्त्यांवर थुंकणाऱ्या 5 हजार 978 जणांकडून प्रत्येकी 1 हजार रूपयांप्रमाणे एकूण 15 लाख 33 हजार 400 रूपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. विनामास्क फिरणाऱ्या 80 हजार 869 जणांवर कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून 500 रूपयांप्रमाणे एकूण 4 कोटी 4 लाख 34 हजार 514 रूपये दंड आकारला गेला आहे.
सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करता गर्दी करणाऱ्या एकूण 1 हजार 43 जणांना दंड करण्यात आला आहे. त्यांच्याकडून 2 हजार 500 रूपयांप्रमाणे एकूण 23 लाख 32 हजार 502 रूपयांचा दंड वसुल करण्यात आला आहे. विनाकारण फिरणाऱ्या एकूण 167 जणांना प्रत्येकी 500 रूपयांचा दंड आकाराला आहे.
तो एकूण 1 लाख 25 हजार 500 रूपये दंड वसूल केला गेला आहे. वरील प्रकारात एकूण 87 हजार 973 बेशिस्त नागरिकांकडून एकूण 4 कोटी 43 लाख 41 हजार 916 रूपयांचा दंड पालिका तिजोरीत जमा झाला आहे. बार व रेस्टॉरंटकडून नियमभंग केला जातो. पहिला नियम भंग करणाऱ्या 1 हजार 356 व्यावसायिकांकडून 33 लाख 90 हजारांचा दंड वसुल करण्यात आला.
दुसऱ्यांदा नियम मोडणाऱ्या 102 व्यावसायिकांकडून 5 लाख 10 हजारांचा दंड जमा केला आहे. तर, तिसऱ्यांदा नियम मोडणाऱ्या 11 व्यावसायिकांना 90 हजारांचा दंड आकारला गेला. असे एकूण 1 हजार 365 व्यावसायिकांकडून एकूण 39 लाख 90 हजारांचा दंड जमा
झाला आहे.