पुणे -अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना दिल्यामुळे “ग्लॅमर’ मिळालेल्या “कॉकटेल ऍन्टीबॉडी’ या इंजेक्शनचा वापर करोना बाधित रुग्णांसाठी केला जात आहे. रेमडेसिवीरला पर्याय म्हणून त्याचा वापर अनेक रुग्णालयांत केला जात आहे.
करोनाची बाधा झाल्यानंतर सुरुवातीच्या काळातच रेमडेसिवीर इंजेक्शन दिल्यानंतर रुग्णांना त्याचा उपयोग झाल्याचे दुसऱ्या लाटेमध्ये निदर्शनाला आले होते. त्यामुळे या इंजेक्शनचा तुटवडा निर्माण होऊन ते मिळवण्यासाठी अक्षरशः युद्धजन्य स्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे याच्या वितरणाची जबाबदारी सरकारने स्वतः घेतली.
याशिवाय प्लाझ्मा थेरपी ही अनेक रुग्णांवर करण्यात आली. याचाच सुधारित अवतार म्हणून या कॉकटेल अँटीबॉडीचा वापर केला जात आहे. बाधित रुग्णांच्या शरीरात थेट अँटीबॉडी सोडून ही उपचार पद्धती केली जात आहे. त्यामुळे रुग्णांना फायदा होतो आणि रुग्ण बरे होतात,
असा दावा अनेक डॉक्टरांनी केला आहे. वास्तविक या घटनेनंतर इंजेक्शनची किंमत सुमारे दीड लाखांच्या आसपास असल्याने ते सगळ्यांनाच परवडते, असे नाही. मात्र, काही खासगी रुग्णालयांनी याचा दणक्यात प्रचारही सुरू केला आहे.
करोना बाधित रुग्णाला रेमडेसिवीर किंवा प्लाझ्मा देतो त्याला पर्याय म्हणून कॉकटेल अँटीबॉडी हे इंजेक्शन आहे. आता, करोनावर उपचारासाठी अनेक औषधे, इंजेक्शन अनेक कंपन्यांनी आणले आहेत. त्यातीलच हा एक प्रकार आहे. डोनाल्ड ट्रम्प यांना हे इंजेक्शन दिले होते, त्यामुळे याला ग्लॅमर मिळाले आहे.
– डॉ. किरण भिसे, समन्वयक, बाणेर कोविड सेंटर