पुणे – एका तरुणाला सर्दी, खोकला अन् ताप होता. खबरदारी म्हणून त्याच्या घशातील स्रावाचे नमुने घेण्यात आले. त्याला क्वारंटाइन करण्यात आले. पण, त्याने कोरोनाच्या भीतीपोटी आत्महत्या केली. मात्र, त्याचा करोनाचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. तो फक्त एक दिवस थांबला असता, तर त्याचा जीव वाचू शकला असता. या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे.
खडकी परिसरातील या तरुणाला सर्दी, खोकला व ताप अशी लक्षणे होती. त्यामुळे गुरुवारी दुपारी घशातील स्रावाचे नमुने घेऊन ते प्रयोगशाळेकडे पाठवण्यात आले होते.
दरम्यान, त्यास श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने बोपोडी येथील खेडेकर रुग्णालयात हलवण्यात आले. त्याचा करोना तपासणी अहवाल शुक्रवारी येणार होता. मात्र, आपल्याला करोना झाला आहे, अशी त्यास भीती वाटत होती.
दरम्यान, गुरुवारी रात्री साडेनऊ वाजता पावसामुळे वीज गेली होती. त्यामुळे अंधाराचा फायदा घेऊन या तरुणाने रुग्णालयाच्या छतावरून उडी मारुन आत्महत्या केली.