पुणे- करोनाविरुद्धच्या लढ्यात शहरातील पोलीस अधिकाऱ्यांचे कुटुंबीयदेखील सहभागी झाले आहेत. आजी व माजी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या पत्नींनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या “आयपीएस ऑफिसर्स वाईव्ज ऑर्गनायझेशन, पुणे’ (आयपीएसओडब्ल्यूओ)च्या माध्यमातून या रणरागिणी आपली सामाजिक जबाबदारी पार पाडत आहेत. आतापर्यंत 7 हजारांपेक्षा अधिक परप्रांतीय नागरिकांना रेल्वेद्वारे त्यांच्या राज्यात पाठविण्यात आले आहे. या सर्व नागरिकांना प्रवासादरम्यान लागणाऱ्या जीवनाश्यक वस्तूंचा पुरवठा या संघटनेच्या माध्यमातून केला जात आहे.
पुणे पोलीस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम यांच्या पत्नी डॉ. ममता या ऑर्गनायझेशच्या चेअरमन आहेत. गुन्हे शाखेचे अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे यांच्या पत्नी स्मिता यांच्यासह अन्य पदाधिकारी ही धुरा सांभाळत आहेत. गेल्या सात दिवसांपासून या सर्व जणी न थकता हे आव्हान पेलत आहेत.
जे परप्रांतीय मजूर गावी परतणार आहेत, त्यांची यादी मिळताच गर्भवती माता, लहान बाळ, छोटी मुले, वयोवृद्ध यांचा खास विचार करून प्रवासात वापरता येतील असे दुधाचे टेट्रा पॅकेट्स पोलीस कुटुंबीयांकडून देण्यात येत आहेत. प्रवासात ऊर्जा मिळावी, यासाठी दुधासोबत गुळाची ढेपही देण्यात येत आहे. आणखी दहा ते बारा हजार लोकांना मदत देण्यात येणार आहे.
प्रत्येकाने उचलला खारीचा वाटा
सेवेत असलेल्या आणि निवृत्त झालेल्या पोलीस अधिकाऱ्यांच्या कुटुंबीयांनी एकत्र येऊन या वस्तूंसाठी मदत करून खारीचा वाटा उचलला आहे. पोलीस कर्मचारी रोज रेल्वे स्टेशनवर जाऊन या सगळ्या साहित्यांचे वाटप करत आहेत. आलेले साहित्य उतरवून घेणे, ते गेटवर मांडणे, त्याचे प्रत्येक प्रवाशाला वाटप करणे ही सगळी कामे पोलीस कर्मचारी स्वेच्छेने माणुसकीच्या भावनेतून करत आहेत.