शिक्रापूर (प्रतिनिधी) : शिक्रापूरसह (ता. शिरूर) परिसरात दररोज वेगवेगळ्या ठिकाणी कोरोना बाधित रुग्ण आढळून येत असताना आता आज पुन्हा शिक्रापुरात दोन, सणसवाडीत एक तर कोंढापुरी येथे एक कोरोना बाधित रुग्ण आढळून आले असून त्यामध्ये दोन कंपनी कामगाराचा समावेश असल्याची माहिती शिरूर तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र शिंदे यांनी दिली आहे.
शिक्रापूरसह (ता. शिरूर) आजूबाजूच्या सणसवाडी यांसह आदी गावांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी, वेगवेगळ्या सोसायटीमध्ये दररोज नियमितपणे कोरोना बाधित रुग्ण आढळून येत असताना शिक्रापूरसह सणसवाडी परिसरात सोमवारी एकही कोरोना बाधित रुग्ण आढळून आला नसल्याने या भागाला एक दिवस दिलासा मिळाला होता. मात्र आता पुन्हा शिक्रापूर येथील करंजेनगर परिसरातील दोन कंपनी कामगारांना कोरोनाची बाधा झाली आहे. आज आढळून आलेल्या या कंपनी कामगारांमध्ये एक कामगार शिक्रापूर येथील जास्त रुग्ण आढळून आलेल्या कंपनीतील कामगार आहे. तर सणसवाडी येथील एक स्थानिक महिला व कोंढापुरी येथील एक स्थानिक पुरुष यांच्यावर खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु असताना डॉक्टरांच्या सल्ल्याने त्यांची कोरोना तपासणी केली असता त्यांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.
सदर परिसरातील कोरोना बाधित नवीन रुग्णांची माहिती मिळाल्यानंतर आरोग्य पर्यवेक्षक जालिंदर मारणे व आरोग्य सेवक एस. एस. चोपडा, आरोग्य सेविका जनाबाई शिरसाठ व त्यांच्या सहकाऱ्यांनी सदर रुग्ण राहत असलेल्या परिसरात जाऊन ग्रामपंचायतच्या माध्यमातून औषध फवारणी करत परिसर निर्जंतुकीकरण केला. शिक्रापूर येथील दोघांच्या संपर्कातील सात जणांना तर कोंढापुरी येथील इसमाच्या संपर्कातील पाच जणांना तसेच सणसवाडी येथील महिलेच्या संपर्कातील चार जणांना असे एकूण सोळा जणांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. तसेच सर्व कोरोना बाधितांच्या संपर्कातील व्यक्तींची माहिती काढण्याचे काम आरोग्य विभागाने सुरु केले आहे असून नागरिकांनी योग्य खबरदारी घेण्याचे आवाहन देखील आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.