नवी दिल्ली – ब्रिटनच्या काही भागांमध्ये करोना विषाणू नवीन स्वरुपात आढळला आहे. हा विषाणू अधिक वेगाने प्रादुर्भाव पसरवत असल्याने तेथील परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचे वृत्त समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर सर्वच देशांनी खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे. अशातच जागतिक आरोग्य संघटनेकडून (WHO) महत्वपूर्ण माहिती देण्यात आली आहे.
डब्लूएचओचे आपातकालीन प्रमुख मायकल रायन यांनी म्हंटले कि, करोना संकटात अनेकदा आपण कठीण परिस्थितीला सामोरे गेलो असून परिस्थितीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवले आहे. सध्याची परिस्थितीही नियंत्रणाबाहेर नाही. योग्य उपाययोजना करत तो रोखला जाऊ शकतो, असे त्यांनी सांगितले आहे.
दरम्यान, ब्रिटन आणि इटलीत करोना विषाणूचा नवीन अवतार उद्भवला आहे. हा विषाणू मूळ करोना विषाणूपेक्षा 70 टक्के अधिक वेगाने पसरतो. त्यामुळे युरोपातील अनेक देशांनी ब्रिटनहून येणाऱ्या विमानांना बंदी घातली आहे.
ब्रिटनमधील स्थिती कमालीची धोकादायक बनली असून ती हाताबाहेर जाण्याचा धोका आहे, अशी जाहीर कबुली तिथल्या पंतप्रधानांनीच दिली आहे. त्यामुळे एक तृतियांश ब्रिटन लॉकडाऊन खाली आणण्यात आला आहे. हा नवीन विषाणू करोना विषाणूचीच पुढील आवृत्ती आहे. जशी परिस्थिती बदलते तसे हे विषाणूसुद्धा आपली रचना बदलतात आणि ते स्वत:ला अधिक प्रसारयोग्य बनवतात. तसाच प्रकार ब्रिटनमध्ये आढळून येत असून करोनाच्या या नव्या स्वरूपातील विषाणूंनी ब्रिटनवासियांना घेरले आहे.