नवी दिल्ली – उत्तर प्रदेशचे वादग्रस्त सनदी अधिकारी अभिषेक सिंह यांचा राजीनामा उत्तर प्रदेश सरकारने स्वीकारला आहे. दीर्घ रजेमुळे ते फेब्रुवारी २०२३ पासून निलंबित होते. अभिषेक सिंह यांची पत्नी दुर्गा शक्ती नागपाल सध्या बांदा येथील जिल्हाधिकारी आहेत. अभिषेक सिंह आपल्या सोशल मीडिया हँडलवर अनेकदा राजकारणी आणि चित्रपट कलाकारांसोबतचे फोटो शेअर करत असतात. ते जौनपूरच्या जागेवरुन लोकसभा निवडणूक लढवण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
सध्या अभिषेक सिंह जौनपूर ते अयोध्या धाम असा मोफत प्रवास नागरिकांना घडवून आणत आहेत. अभिषेक सिंह गेल्या अनेक महिन्यांपासून जौनपूरमध्ये सामाजिक आणि राजकीयदृष्ट्या सक्रिय आहेत. फेब्रुवारी महिन्यात त्यांनी जौनपूरच्या लोकांसाठी अयोध्या धामला मोफत भेट देण्यास सुरुवात केली. याद्वारे दररोज सुमारे पाच बसेस अयोध्येला जात असून संध्याकाळीते भाविकांना जौनपूरला घेऊन येत आहेत.
या बसला जौनपूर निषाद रथ असे नाव दिले आहे.अभिषेक सिंह यांना २०१५ मध्ये तीन वर्षांसाठी दिल्लीला प्रतिनियुक्तीवर पाठवण्यात आले होते. २०१८ मध्ये हा कालावधी दोन वर्षांसाठी वाढवण्यात आला होता. मात्र त्यावेळी अभिषेक सिंग वैद्यकीय रजेवर गेले. यानंतर दिल्ली सरकारने त्यांना मूळ कॅडर यूपीमध्ये पाठवले.
प्रदीर्घ कालावधीनंतर ते ३० जून २०२२ रोजी ड्युटीवर रुजू झाले. २०२२ मध्ये, अभिषेक सिंह यांना गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी आयोगाने निरीक्षक म्हणून नियुक्त केले होते. यादरम्यान त्यांनी सरकारी वाहनासमोर स्वत:चा फोटो क्लिक करून सोशल मीडियावर अपलोड केला. निवडणूक आयोगाने हे अनुशासनहीन मानले आणि १८ नोव्हेंबर २०२२ रोजी त्यांना निरीक्षकांच्या कर्तव्यावरून काढून टाकले होते.