बीड – बीडमध्ये भाजपच्या खासदार प्रीतम मुंडे यांच्या जागी आता भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांना उमेदवारी दिली जाणार असल्याचे बोलले जात आहे. इतकचं नाही तर पंकजा मुंडे यांचा प्रचार राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे करतील अशीही माहिती समजते.
यावर पंकजा मुंडे यांना प्रश्न विचारला असता, त्यांनी मीच भाजपची स्टार प्रचारक असल्याचे म्हणत, धनंजय मुंडे माझा प्रचार करणार नाहीत, महायुतीत असल्याने ते तिथे येऊ शकतात. परंतु, माझ्या जिल्ह्यातील उमेदवाराचा प्रचार मीच करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
बीडमध्ये प्रीतम मुंडे यांच्या जागी आता भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांना उमेदवारी दिली जाणार आणि तुमचे स्टार प्रचारक धनंजय मुंडे असतील, असे म्हटले जात असल्याचे पंकजा मुंडे यांना विचारण्यात आले.
यावर त्या म्हणाल्या की, बीड जिल्ह्यातून प्रीतम मुंडे या मागची 10 वर्षे खासदार आहेत. त्यांनी अतिशय उत्तम काम केले आहे. राष्ट्रवादीसोबत युती झाल्याने निसर्गत: माझ्या मतदारसंघात प्रश्नचिन्ह उभं राहिले आहे.
मी राज्याची नव्हे तर देशाची स्टार प्रचारक राहिलेली आहे. मी मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थान या सर्व ठिकाणी पक्षाचा प्रचार केलेला आहे. त्यामुळे माझ्या जिल्ह्यातील लोकसभेचा उमेदवार कोणीही असो, स्टार प्रचारक आणि सर्व जबाबदारी ही माझी असणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
लोकसभेसाठी प्रीतम मुंडे यांच्याऐवजी आता पंकजा मुंडे यांच्या नावाची चर्चा होत असल्याचे पंकजा मुंडे यांना विचारण्यात आले. त्यावर त्यांनी माझ्या नावाची चर्चा ही सतत, प्रत्येक निवडणुकीत होत असते. त्यामुळे तुम्ही त्याची सवय करून घ्या, असे त्यांनी पत्रकारांना म्हटले आहे.
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केलेल्या वक्तव्यावर पंकजा मुंडे यांनी उत्तर दिलं आहे. त्या म्हणाल्या की, 2014 आणि 2019 ला मी आणि धनंजय मुंडे एकमेकांविरोधात लढलो आहोत. त्यामुळे आता भविष्यात आणखी काही अनुभव वाट्याला येतात का हे पाहावं लागणार असल्याचं मुंडे म्हणाले.