पुणे(प्रतिनिधी) – शिवाजीनगर, कौटुंबिक न्यायालयानंतर आता ग्राहक मंचाचे कामकाजही येत्या सोमवारपासून (दि. 8) सुरू होणार आहे. राज्यात रेड झोनमधील जिल्ह्यामध्ये व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे तर उर्वरित सर्व जिल्हात नियमितपणे काम चालणार आहे. राज्य ग्राहक आयोगाचे अध्यक्ष ए.पी.भंगळे यांनी याबाबत आदेश काढला आहे. त्यामुळे ग्राहकांची न्यायासाठी सुरू असलेली प्रतिक्षा लवकरच संपणार आहे.
खरेदी केलेल्या वस्तुबाबत फसवणूक झाल्यास ग्राहकांना ग्राहक मंचात न्याय मागता येतो. ग्राहक आणि फसवणूक केलेल्या कंपनीची बाजू ऐकुण घेऊन मंच निर्णय देत असते. मात्र, करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व न्यायालये बंद होती. त्यानुसार ग्राहक मंचही बंद होती. त्यामुळे लॉकडाऊन काळात फसवणूक झाल्यावरही न्याय मागणे ग्राहकांना अवघड झाले होते. दाखल झालेल्या प्रकरणांना पुढील तारखा देण्यात येत होत्या. उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार आता सर्व न्यायालये करोना संसर्गाच्या सुरक्षिततेच्या उपाययोजना करून सुरू करण्यात येणार आहेत. त्यानुसार ग्राहक मंचही सुरू होणार आहे.
रेड झोनमधील जिल्ह्यात केवळ अर्जंट आणि अंतिम सुनावणीवर असलेल्या प्रकरणाची व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे सुनावणी होनार असून, इतरत्र सुरळीत कामकाज सुरू होणार आहे. याविषयी ग्राहक मंचात प्रॅक्टीस करणारे वकील अॅड. पवनकुमार भन्साळी म्हणाले, ग्राहक मंच सुरू झाल्याचे ग्राहकांकडून स्वागत करण्यात येत आहे. ग्राहक मंच सुरू झाल्यामुळे ग्राहकांना आता लवकर न्याय मिळणार आहे. पेंडिग प्रकरणावर लवकर सुनावणी होऊन निकाल लागतील.