पुणे – देशव्यापी लॉक डाऊनच्या टप्प्यापासून केशकर्तनालये बंद असल्याने या व्यावसायिकांवर मोठं आर्थिक संकट ओढवलं आहे. या संकटातून सुटका करण्यासाठी आता राज्य शासनाने केशकर्तनालये चालवणाऱ्या व्यावसायिकांना आर्थिक मदत करावी अशी मागणी महाराष्ट्र सलून व्यावसायिक व पार्लर असोशिएशनतर्फे करण्यात आली आहे. सरकारने आपल्या मागण्या मान्य कराव्या अशी मागणी करत आज पुण्यामध्ये महाराष्ट्र सलून व्यावसायिक व पार्लर असोशिएशनतर्फे आंदोलन करण्यात आलं.
यावेळी आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या केशकर्तनालये व्यावसायिकांनी सोशल डिस्टंसिंगचे पालन करत तोंडावर मास्क बांधून मागण्यांचे फलक झळकावले. सरकारने इतर सर्व व्यावसायिकांना दुकाने उघडण्याची परवानगी दिली आहे मात्र केशकर्तनालयांना अद्याप परवानगी देण्यात आली नाही. राज्यातील केशकर्तनालयांना परवानगी देण्यात यावी, सरकारने दिल्ली, उत्तर प्रदेश, कर्नाटकच्या धर्तीवर केशकर्तनालये व्यावसायिकांनी रोख आर्थिक मदत करावी अशी मागणी नाभिक समाजाचे नेते सोमनाथ काशीद यांनी केली.
याबाबत महाराष्ट्र सलून व्यावसायिक व पार्लर असोशिएशनतर्फे राज्य सरकारला एक निवेदनही देण्यात आले असून यामध्ये केशकला बोर्ड कार्यान्वित करून निधी उपलब्ध करून द्यावा, सहा महिन्यांचे दुकान भाडे व लाईट बिल माफ करावे, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सलून व्यवसाय सशर्त सुरु करण्यास परवानगी द्यावी, या मागण्या करण्यात आल्या आहेत.