बारामती तालुक्यातील प्रकार ः महावितरणच्या अधिकाऱ्यांचे अक्षम्य दुर्लक्ष
मोरगाव – बारामती तालुक्यात महा वितरण कंपनीच्या खांबांवर बेकायदेशीर खासगी केबलचा विळखा पडला आहे. महावितरण कंपनीने याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करत असल्याने सर्वसामान्य वीज ग्राहकांनी संताप व्यक्त केला आहे. या खासगी टीव्ही केबल चालकांवर महावितरण कंपनीने कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
तालुक्यातील वीज वितरण कंपनीच्या सोमेश्वर विभागांतर्गत असलेल्या विद्युत वाहक खांबांवर सध्या बेकायदेशीर खासगी केबल टाकल्याचे दिसून येत आहे. या व्यावसायिकांनी स्वतःची वेगळी यंत्रणा व स्वतःचे खांब उभारण्याची गरज असताना स्वतःची मंजुरी व मनमानी करत चक्क महा वितरण कंपनीच्या खांबांवरून खासगी टीव्ही केबल टाकण्याचा प्रताप केला आहे.
सध्या कमी व उच्च दाबाच्या अनेक वीजवाहक खांबांवर खासगी केबलचे बंडल व सेट अप बॉक्स पाहावयास मिळत आहेत. परंतु राजरोसपणे विद्युत खांबांवर केबल टाकण्यात आल्यानंतर ही वीज वितरण कंपनीचे अधिकारी याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करून बघ्याची भूमिका घेत
आहेत.
तालुक्याच्या पश्चिम भागातील बहुतांशी गावात हा प्रकार सर्रास पाहावयास मिळत असून शेतकऱ्यांच्या शेतजमिनीतही या केबलचे बंडल खाली पडल्याने शेतकरी हैराण झाले आहेत. त्यामुळे महावितरण कंपनीचे अधिकारी या खासगी केबल व्यावसायिकांवर कारवाईचा बडगा केव्हा उगारणार असा सवाल नागरिकांनी केला आहे.
अधिकाऱ्यांचा कानाडोळा का?
बारामती तालुक्यातील विद्युत खांबांवर खासगी केबल व्यावसायिकांनी बेकायदा केबल टाकली आहे. मात्र, याकडे वीज वितरण कंपनी अधिकारी याकडे कानाडोळा करीत आहेत. त्यामुळे या व्यावसायिकांबरोबर अधिकाऱ्यांचा काही साटेलोटे आहे? असा प्रश्न नागरिकांमधून विचारला जात आहे. तसेच या केबल शेतकऱ्यांचा शेतात पडल्या असून त्याचा त्रास त्यांना होत आहे. तसेच या केबल व्यावसायिकांना कोणाचाही धाक नसल्याने ते बिधास्तपणे विद्युत खांबांवर केबल टाकत सुटले आहेत.