सातारा – कॉंग्रेसच्या जिल्हा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पक्षवाढीसाठी आणखी प्रयत्न करावेत. जिल्ह्यातील पक्ष भक्कम करण्यासाठी सहकार्य करण्याची ग्वाही महिला व बालविकास मंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांनी दिली.ना. ठाकूर यांनी सातारा जिल्हा कॉंग्रेस भवनला भेट दिली. जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव व सहकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले.
ना. ठाकूर म्हणाल्या, यशवंतराव चव्हाण यांची परंपरा लाभलेल्या कॉंग्रेस भवनात येण्याचे भाग्य लाभले. जिल्ह्यातील कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी यशवंतराव चव्हाण यांचे विचार आणि धोरणे जनतेपर्यंत पोहोचवली पाहिजेत. पक्षाने कायम ताकद दिली, आमदार केले, तरी अनेक जण पडत्या काळात पक्ष सोडून गेले. अशा गद्दारांना जागा दाखवा. उद्याचे दिवस कॉंग्रेसचे असल्याने कार्यकर्त्यांनी खचून न जाता, जोमाने कामाला लागावे.
पक्ष मोठा झाला तर तुम्ही आम्ही मोठे होऊ. यावेळी महिला आघाडी जिल्हाध्यक्ष अल्पना यादव, प्रदेश चिटणीस राजेंद्र शेलार, ऍड. दत्तात्रय धनावडे, मनोजकुमार तपासे, रजनी पवार, धनश्री महाडिक, बाबासाहेब कदम, श्रीकांत चव्हाण, वैशाली जाधव, जस्मीन खान, रजिया शेख, मंजिरी पानसे, सुषमाराजे घोरपडे, नाजीम इनामदार, अमर करंजे, डॉ. पल्लवी साठे उपस्थित होत्या. जिल्हा सरचिटणीस नरेश देसाई यांनी सूत्रसंचालन केले.