आजी-माजी मंत्र्यांमध्ये प्रतिष्ठेची लढाई
विजय शिंदे
वडापुरी – इंदापूर तालुक्यातील राजकारण तापायला सुरुवात झाली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या तयारीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस व भारतीय जनता पक्षाच्या वतीने विकास कामांचा उद्घाटनाचा धडाका सुरू झाला आहे.
इंदापूर तालुक्यात पूर्वीचे 7 व वाढीव 2 असे एकूण 9 जिल्हा परिषद गट तयार झाले आहेत. तर पंचायत समितीचे 18 गण झाले आहेत. तालुक्यातील गट व गण रचना नव्याने करण्यात आली असून ती जाहीर होणे अद्याप बाकी असले तरी काही गट व गणाची रचना मात्र घड्याळ्याच्या काट्यानुसार होणार असल्याचे राजकारणातील जाणकारांचे मत आहे.
पुणे जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे वर्चस्व असून इंदापूर पंचायत समितीवर माजी मंत्री हर्षवर्धन पाटील अर्थात भाजपचे वर्चस्व आहे. इंदापूर तालुक्यात कोट्यवधी रुपयांची विकासकामे झाली असल्याचा दावा राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडून केला जात आहे; परंतु कामात गुणवत्ता नसल्याचे आरोप विरोधी पक्षाकडून केला जात आहे. त्यामुळे आगामी काळात होणाऱ्या निवडणुकीत जनता कोणाचा दावा फेटाळून लावत कोणाला संधी देते हे महत्त्वाचे ठरणार आहे.आजी-माजी मंत्र्यांसाठी येणारी निवडणूक ही प्रतिष्ठेची असणार आहे.
माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हक्काचा बावडा- लाखेवाडी गटामधून अनेक गावांची तोडफोड केल्याची चर्चा आहे. या गटामधून नवीन गट उदयाला येणार असल्याची शक्यता राजकीय गोटात व्यक्त होत आहे. या गटातून हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या अंकिता पाटील-ठाकरे ह्या सदस्य आहेत. तर जिल्हा सहकारी बॅंकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे यांचे बंधू प्रदीप जगदाळे पंचायत समिती सदस्य असून पाटील व जगदाळे यांचे वर्चस्व या गटावर दिसून येते. या गटात राज्यमंत्री दत्तात्रय भरणे कसे आव्हान उभे करतात हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
जिल्हा परिषदेचे माजी सभापती प्रवीण माने यांच्याही पळसदेव- बिजवडी गटातील काही गावे वगळून नवीन गण तयार झाल्याची चर्चा आहे. जिल्हा परिषद सभापती म्हणून कार्यरत असताना माने यांनी इंदापूर तालुक्यात विविध विकास कामे राबवली असून तालुक्यात त्यांना मानणारा एक मोठा वर्ग आहे. गेली वर्षभर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या कार्यक्रमापासून ते अलिप्त आहेत; परंतु पुन्हा एकदा राष्ट्रवादीच्या चिन्हावर त्यांना संधी मिळणार असल्याची चर्चा आहे.
छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन अविनाश घोलप यांच्या घराचे वर्चस्व असणाऱ्या सणसर-लासुर्णे जिल्हा परिषद गटातही नवीन रचनेचा प्रभाव पडणार आहे. घड्याळाच्या विचाराची काही गावे या गटात सामील झाली असल्याची चर्चा आहे. यापूर्वी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषद व पंचायत समितीचे दोन्ही उमेदवार निवडून आले आहेत. सणसर- गणातून माजी सभापती करणसिंह घोलप हे नेतृत्व करत असून लासुर्णे गणात उपसभापती हेमंत नरोटे सदस्य आहेत; परंतु हर्षवर्धन पाटील यांच्या हक्काच्या या गटात विधानसभा निवडणुकीत राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी अनपेक्षितपणे मताधिक्य घेतले होते.
काटी-वडापुरीगट हा राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या ताब्यात असून अभिजीत तांबिले हे सदस्य आहेत. पुन्हा ते इच्छुक असून भेटीगाठी सुरू केल्या आहेत. काटी गण हर्षवर्धन पाटील यांच्या गटाकडे आहे. सभापती स्वाती शेंडे या सदस्य आहेत. तर वडापुरी गण राष्ट्रवादीकडे आहे.
उमेदवार निवडताना कसरत
आगामी काळात होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत गट गण रचनेचा प्रभाव दिसून येणार आहे. त्यानंतर उमेदवार निवडताना राजकीय पक्षांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे. विविध राजकीय पक्षांची उमेदवारी कोणाला मिळणार? तर कोण पक्षांतर अथवा कोणावर अपक्ष लढण्याची वेळ येणार? हीच चर्चा आहे.
श्रीराज, राजवर्धन यांच्या उमेदवारीची चर्चा
नीरा-भीमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक व हर्षवर्धन पाटील यांचे सुपूत्र राजवर्धन पाटील यांच्याही नावाची चर्चा सुरू आहे. राजकीय कार्यक्रमाव्यतिरिक्त वैयक्तिक कार्यक्रमांना ते हजेरी लावत असतात. त्यामुळे त्यांना संधी मिळावी, अशी युवकांमधून मागणी आहे. तर राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांचे सुपूत्र श्रीराज भरणे हे वैयक्तिक कार्यक्रमांना भेटीगाठी देत असतात. राज्यमंत्री भरणे यांच्या अनुपस्थित तालुक्यात होणाऱ्या सर्व कार्यक्रमांना ते हजेरी लावतात. त्यांना वाढलेल्या नवीन गटातून संधी मिळणार असल्याची चर्चा आहे.