हरियाणा सरकारविरोधात कॉंग्रेस आणणार अविश्‍वास ठराव

शेतकरी आंदोलनावरून कोंडी करण्याची रणनीती

चंडीगढ  – हरियाणातील भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारविरोधात अविश्‍वास ठराव आणण्याच्या हालचाली कॉंग्रेसने सुरू केल्या आहेत. शेतकरी आंदोलनावरून त्या राज्यात राजकीय अस्वस्थता निर्माण झाली आहे. त्याचा आधार घेऊन कॉंग्रेसने हरियाणा सरकारची कोंडी करण्याची रणनीती आखली आहे.

केंद्रीय कृषी कायदे मागे घेण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी दिल्लीच्या सीमांवर आंदोलन सुरू केले आहे. आंदोलकांमध्ये प्रामुख्याने पंजाबचे शेतकरी आहेत. हरियाणातील शेतकऱ्यांची संख्याही लक्षणीय असल्याचे सांगितले जात आहे. त्या आंदोलनाची धग हरियाणा सरकारला जाणवू लागली आहे. त्या राज्यात भाजप-जेजेपी युतीचे सरकार आहे.

त्याशिवाय, काही अपक्षांनी सरकारला पाठिंबा दर्शवला आहे. मात्र, शेतकऱ्यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी दोन अपक्षांनी सरकारचा पाठिंबा काढून घेतला. त्याशिवाय, जेजेपीच्या काही आमदारांनीही राज्य सरकारविरोधी वक्तव्ये केली. त्यापार्श्‍वभूमीवर, कॉंग्रेसने हरियाणा सरकारला खिंडीत गाठण्याची तयारी चालवली आहे.

मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांच्या सरकारने जनतेचा आणि विधानसभेचा विश्‍वास गमावला आहे. त्यामुळे सरकारविरोधात अविश्‍वास ठराव मांडण्यासाठी विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी आम्ही करणार आहोत, असे कॉंग्रेसचे नेते भुपिंदरसिंह हुडा यांनी शुक्रवारी सांगितले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.