नवी दिल्ली – कर्जबुडव्या उद्योगपती विजय मल्ल्याला आणखी एक दणका बसला असून फ्रान्समधील 14 कोटींच्या संपत्तीवर टाच आणण्यात आली आहे. युरो 1.6 मिलियन अर्थात सुमारे 14 कोटींची ही मालमत्ता आहे. यासंदर्भात फ्रान्समधल्या तपास यंत्रणांनी माहिती दिली आहे.
आम्ही फ्रान्समधल्या तपास यंत्रणांना विजय मल्ल्याची मालमत्ता जप्त करण्यासंबंधीची विनंती केली होती. त्यानंतर मनी लॉंड्रींग कायद्यांतर्गत ही कारवाई करण्यात आली, असे ईडीने म्हटले आहे. विजय मल्ल्याची 32 Avenue FOCH या ठिकाणी असलेली मालमत्ता फ्रेंच अधिकाऱ्यांनी जप्त केली आहे. विजय मल्ल्यावर 9 हजार कोटी रुपये बुडवल्याचा आरोप आहे.
जानेवारी 2019 मध्ये विजय मल्ल्याला मनी लॉन्ड्रिंग ऍक्ट अंतर्गत कोर्टाने फरार आरोपी घोषित केले होते. मार्च 2019 पासून तो लंडनमध्ये राहत असून भारत सरकार त्याच्या प्रत्यार्पणासाठी प्रयत्न करते आहे.
दरम्यान, ब्रिटनमध्ये विजय मल्ल्याच्या प्रत्यार्पणासंदर्भातला खटला सुरु आहे. याआधी न्यायालयाने त्याच्या प्रत्यार्पणाला मंजुरी दिली होती. मात्र या निर्णयाला विजय मल्ल्याच्या वकिलांनी आव्हान दिले. तसेच विजय मल्ल्याने ब्रिटन सरकारला शरणार्थी म्हणून आश्रय देण्याचीही विनंती केली आहे. भारत सरकारने याप्रकरणी विशेष बाब म्हणून प्रत्यार्पण मंजूर करावे, अशी विनंती केली आहे.