सिमला – कॉंग्रेसनेही हिमाचल प्रदेशातील नागरीकांना मोफत वीजेचे आश्वासन दिले आहे. आमचा पक्ष सत्तेत आल्यास हिमाचल प्रदेशात घरगुती वीज ग्राहकांना 300 युनिट मोफत वीज आणि गरीब महिलांना दरमहा 1,500 रुपयांची आर्थिक मदत देण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे.
छत्तीसगडचे मुख्यमंत्री आणि कॉंग्रेसचे हिमाचल प्रदेशचे मुख्य निवडणूक निरीक्षक भूपेश बघेल यांनी हे आश्वासन दिले असून त्यांनी म्हटले आहे की, सत्ता स्वीकारल्यानंतर 10 दिवसांच्या आत या राज्यातील सरकारी सेवकांना जुन्या पेन्शन योजना लागू केल्या जातील.
यासाठी पैसा कोठून आणणार असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता बघेल म्हणाले की, आश्वासने पूर्ण करण्यासाठी राज्याच्या अर्थसंकल्पात योग्य तरतुदी केल्या जातील. या आश्वासनांचा पक्षाच्या निवडणूक जाहीरनाम्यात समावेश केला जाईल, आणि तो लवकरच जारी केला जाणार आहे, असेही ते म्हणाले. हिमाचल प्रदेशात डिसेंबरमध्ये निवडणूक होण्याची शक्यता आहे.