नगर, – नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघ कोणत्याही परिस्थितीत कॉंग्रेसकडे घ्यावा, हा पक्षाचा पारंपारिक मतदारसंघ आहे. देशात भाजप विरोधी जनमत निर्माण झाले आहे. दक्षिणची जागा कॉंग्रेस जिंकेल, त्यासाठी माजी महसूलमंत्री आ.बाळासाहेब थोरात यांना उमेदवार करण्याची एकमुखी मागणी कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी निरीक्षक चंद्रकांत हांडोरे यांच्याकडे केली. कार्यकर्त्यांच्या भावना कोअर कमिटीसमोर मांडणार असल्याचे यावेळी हांडोरे म्हणाले.
दक्षिणेची आढावा बैठक नगर शहरात रविवारी रात्री झाली.या बैठकीत दक्षिणेची जागा कॉंग्रेसने लढवावी असा कार्यकर्त्यांचा आग्रह आहे. आ. बाळासाहेब थोरात यांच्याशी चर्चा करून ही जागा कॉंग्रेसकडे घेण्यासाठी आम्ही टोकाचा आग्रह धरू. त्यासाठी मित्र पक्षांशी ही आम्ही चर्चा करू. त्यांना समजावून सांगू, असे हांडोरे म्हणाले. आ. लहू कानडे म्हणाले, ही कॉंग्रेसची सुवर्णभूमी आहे. ज्यांना कॉंग्रेसने भरभरून दिले, त्यांनीच ताटात छेद केला. जिल्ह्यातील कॉंग्रेस थोरातांनी सांभाळली अडचणीच्या काळात कार्यकर्त्यांना आधार दिला. जिल्ह्यातील दोन्ही जागा पक्षाने लढवाव्यात. जिल्हाध्यक्ष राजेंद्र नागवडे म्हणाले, दक्षिणची जागा कॉंग्रेस नक्की जिंकेल. थोरातांची सगळ्यांना बरोबर घेऊन चालण्याची प्रतिमा, महाविकास आघाडीला असणारे समर्थन यामुळे विजय खेचून आणता येईल.
कॉंग्रेसने दक्षिणेकडे लोकसभेची जागा घेऊन श्रेष्ठींनी थोरातांना उमेदवार दिल्यास शहरातील आमदारांच्या दहशतीसह विखेंचे ही प्रशासनाच्या दुरुपयोगाच्या माध्यमातून असणारे दक्षिणेतील दहशतीचे झाकण मतदारांच्या मदतीने कॉंग्रेस कार्यकर्ते कायमचे उडवतील असे जिल्हाध्यक्ष किरण काळे म्हणलो.
यावेळी प्रदेश सरचिटणीस वीरेंद्र किराड, प्रदेश सचिव सचिन गुंजाळ, युवक प्रदेशाध्यक्ष समिता गोरे, महिला आयोगाच्या सदस्या उत्कर्षा रूपवते, प्रदेश सचिव हेमंत ओगले, समन्वयक ज्ञानदेव वाफारे, अनिस चुडीवाला, प्रा. डॉ. बापू चंदनशिवे, महिला शहर जिल्हाध्यक्ष उषाताई भगत आदी उपस्थित होते.