रांची: झारखंड विकास मोर्चा या विरोधी आघाडीत असलेल्या पक्षाचे नेते बाबुलाल मरांडी यांनी झारखंड विधानसभेची निवडणूक स्वबळावर लढवण्याची घोषणा केली असली तरी ते विरोधकांच्याच महाआघाडीत राहावेत यासाठी कॉंग्रेसचे प्रयत्न सुरू झाले आहेत.
मरांडी हे झारखंडचे माजी मुख्यमंत्री आहेत. त्यांनी म्हटले होते की विरोधी आघाडीत राहण्याची आपली इच्छा होती पण आपल्याशी कोणी चर्चाच करण्यात स्वारस्य दाखवायला तयार नव्हते. त्यामुळे आपण स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे.
कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष रामेश्वर ओरोन हे लवकरच मरांडी यांची भेट घेतील आणि त्यांना महागठबंधन मध्ये पुन्हा समाविष्ट करण्याचा प्रयत्न करतील असे प्रदेश कॉंग्रेसच्यावतीने सांगण्यात आले.
झारखंड मधील लोकसभेच्या महागठबंधन मध्ये मरांडी यांचा पक्षही सामिल होता. या महागठबंधन मध्ये या कॉंग्रेस, झारखंड मुक्ती मोर्चा, राष्ट्रीय जनता दल, आणि झारखंड विकास मोर्चा हे पक्ष सामील होते. ही आघाडी तशीच कायम टिकवण्याचा प्रयत्न कॉंग्रेसकडून सुरू आहे.