मुंबई- उत्सवाच्या काळात घर विक्रीला चालना मिळावी याकरिता स्टेट बॅंकेने घरासाठीच्या कर्जावरील व्याजदरात 0.25 टक्क्यांपर्यंत सवलत देण्याची घोषणा केली आहे. ही सवलत सिबिल मानांकनाच्या आधारावर उपलब्ध असेल.
त्याचबरोबर ग्राहकांना स्टेट बॅंकेच्या योनो ऍपच्या माध्यमातून प्रस्ताव दाखल करावा लागेल. या योजनेनुसार 75 लाख रुपयावरील गृहकर्जासाठी 0.25 टक्क्यांची सवलत मिळेल.
उत्सवाच्या काळात स्टेट बॅंकेने अगोदर 30 लाख ते 2 कोटी रुपयांपर्यंतच्या घर कर्जावरील व्याजदरात 0.10 टक्क्यांची सवलत दिली होती. ती आता 0.20 टक्के करण्यात आली आहे. ही सवलत आठ महानगरात तीन कोटी रुपयांपर्यंतच्या गृहकर्जसाठी उपलब्ध असेल. त्याचबरोबर योनो ऍपच्या माध्यमातून प्रस्ताव दाखल केल्यास अतिरिक्त 0.05 टक्के सवलत मिळणार आहे.
स्टेट बॅंक 30 लाख रुपयांपर्यंतच्या गृहकर्जावर 6.90 टक्क्यांपासून तर 30 लाखांवरील गृहकर्जावर 7 टक्क्यांपासून व्याजदर आकारत आहेत. स्टेट बॅंकेचे व्यवस्थापकीय संचालक सी. एस. शेट्टी यांनी सांगितले की, करोनाच्या परिस्थितीत नागरिक उत्सवाला सामोरे जात आहेत. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीत ग्राहकांना आणि विकसकांना चालना मिळावी याकरिता स्टेट बॅंकेने हा पुढाकार घेतला आहे. त्याचबरोबर बॅंकेने कार, सोने आणि वैयक्तिक कर्जासाठी योनोच्या माध्यमातून प्रस्ताव सादर केल्यास प्रक्रिया शुल्क माफ केलेले आहे.