नेवासा – तहसिलदार संजय बिरादार यांच्या दुर्लक्षामुळे पुरवठा शाखेतून नवीन रेशनकार्ड काढण्यासाठी आलेल्या नागरिकांना रेशनकार्ड शिल्लक नसल्याचे सांगून दलालांमार्फत दहा हजार रुपये घेतल्यानंतर झटपट रेशनकार्ड दिले जात असल्याच्या तक्रारी खासदार सदाशिव लोखंडे यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांनी केल्यामुळे तहसिलदारांची बोलती बंद झाली.
तहसिलदार आपल्या कार्यालयात लक्ष न देता केवळ उडवाउडवीचे उत्तरे देत कामात चालढकलपणा करत असल्यामुळे तहसिलदारांची तातडीने बदली करा, अशी एकमुखी मागणी कार्यकर्त्यांनी केली.
लोकसभा निवडणूक झाल्यानंतर प्रथमच खासदार सदाशिव लोखंडे हे बुधवारी सकाळी ११ वाजता नेवासा शहरात आले. यावेळी भाजपाचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे, शिवसेनेचे संपर्कप्रमुख बाळासाहेब पवार, उपजिल्हा प्रमुख भगवान गंगावणे, शिवसेना नेते भाऊसाहेब वाघ, अॅड.कारभारी वाखुरे, भाजपाचे तालुकाध्यक्ष भाऊसाहेब फुलारी,
शहराध्यक्ष मनोज पारखे, राजेंद्र मुथ्था, सुनिल वाघ, बाबा कांगुणे, मनसेचे शहराध्यक्ष रविंद्र पिंपळे, बाळासाहेब क्षीरसागर, प्रतिक शेजूळ, बापूसाहेब दारकुंडे, अजित नरुला, प्रकाश निपुंगे यांच्यासह महायुतीचे सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रेशनकार्ड संदर्भात कार्यकर्त्यांची तक्रारी केल्यानंतर खासदार सदाशिव लोखंडे यांनी पुरवठा निरीक्षकांना समोर बोलवा, असे तहसिलदारांना सांगताच पहिले ‘त्या’ रजेवर आहेत, नंतर त्या नगरला बैठकीला गेलेल्या असल्याचे सांगून खासदारांनाच तहसिलदारांनी उडवाउडवीचे उत्तरे देऊन वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला.
मात्र, कार्यकर्त्यांनी त्या वसुलीला गेल्या असतील,असा टोमणा मारला. रेशनकार्डला दहा हजार रुपये दिल्यानंतर झटपट रेशनकार्ड कसे काय मिळते? असा प्रश्न कार्यकर्त्यांनी केल्यामुळे तहसिलदार बिरादार यांची खासदार लोखंडे यांनी चांगलीच झाडाझडती घेत कानउघडणी केली.
नेवासा शहराला पंधरा दिवसांतून एकदा पाणी मिळते, तालुक्यातही पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झालेला आहे. ज्या गावांना पाण्याचा प्रश्न बिकट बनलेला आहे, तिथे तातडीने टँकरव्दारे पाणी पुरवठा सुरू करा, पुन्हा जनतेच्या तक्रारी आल्या तर याद राखा, असा सज्जड दिला.
खासदार लोखंडे यांच्याकडे आलेल्या जनतेच्या तक्रारीमुळे त्यांनी थेट जिल्हा पुरवठा अधिकारी, महावितरण कंपणीच्या अधिकाऱ्यांची कानउघडणी करत नगरपंचायतीचे मुख्याधिकारी यांना शहरात टँकरने पाणी पुरवठा सुरू करण्याच्या सूचना केल्या. त्यामुळे खासदार लोखंडे कामाचा माणूस असल्याची प्रचिती निवडणूक झाल्यावरही दिसून आली.