नेवासा, (प्रतिनिधी) – सोनई (ता.नेवासा) येथे भारतीय जनता पार्टीचे युवानेते ऋषिकेश शेटे यांच्यावतीने टंचाईग्रस्त भागात टँकरने मोफत पाणी पुरवठा मोहीम सुरू करण्यात आली. पाण्यासाठी व्याकुळ झालेल्या महिला मंडळींच्या चेहऱ्यावर हसू फुलले असून पाण्याची टंचाई असेपर्यंत मोफत पाणी पुरवठा करणार असल्याचे शेटे यांनी सांगितले.
सोनई गावामध्ये मोफत पाणी वाटपाचा शुभारंभ दत्तू मस्के, सारंग फोपसे व राजाभाऊ दराडे यांच्याहस्ते नारळ ओढावून पाणी वाटपाची सुरुवात करण्यात आली. दररोज वाॅर्ड व भाग बदलून शक्य तितक्या प्रमाणात टँकरने पाणी पुरवठा करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगितले.
शेटे म्हणाले की, ग्रामपंचायत प्रशासनाचा केवळ नाकर्तेपणा याला कारणीभूत असून, ज्यांच्या ताब्यात ही ग्रामपंचायत गेली ७० वर्षापासून आहे, त्यांना देखील आजपर्यंत या गावचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडावलेला नाही.ग्रामपंचायतीकडे पंप दुरुस्त करण्यासाठी पैसे नसतील तर माझ्याकडून पैसे घेऊन जावे परंतु गावाला पिण्याचे पाणी द्या,
असे आवाहन ऋषिकेश शेटे पाटील यांच्यावतीने सोनई ग्रामपंचायतीला करण्यात आले. याप्रसंगी संदीप काकडे, प्रसाद दरंदले,रामकृष्ण आगळे,विशाल धनगर,सारंग फोपसे, प्रमोद घावटे, सतीश गडाख,सूरज शेटे, प्रताप कोंगे, भाजपा युवा मोर्चा सरचिटणीस प्रकाश गायके, सोनई शहराध्यक्ष नामदेव येळवंडे, तालुका उपाध्यक्ष संभाजी गडाख, कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.