नेवासा, (प्रतिनिधी) – जैनपूर गावात अवैध वाळू उपसा विरोधात ग्रामपंचायतीने ठराव घेतलेला असतानाही वाळूतस्करांचा दिवसाढवळ्या गोदावरी पात्रातून खुलेआमपणे वाळू उपसा करण्याचा नंगानाच सुरू आहे. या वाळू उपशाला जैनपूर गावच्या महिला सरपंचांच्या पतीने विरोध केला असता पतीला डंपरने धडक दिली.
सरपंचांसह त्यांच्या घरच्या मंडळींना जातीवाचक शिवीगाळ करण्याची घटना जैनपूर गावात शनिवारी (दि.२५) घडल्यामुळे पुन्हा एकदा नेवाशात वाळूतस्करांची दादागिरी सुरू झाली. महिला सरपंच शैला किशोर शिरसाठ यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन नेवासा पोलीस ठाण्यात वाळूतस्करांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
गोदावरी नदीमधून अवैध वाळू उपसा बंद होण्याबाबतचा ठराव ग्रामसभेमध्ये मंजूर केलेला आहे. नेवासा येथील कृष्णा परदेशी व इतर वाळूतस्कर हे अवैध वाळू उपसा करत असतान त्यांना वेळोवेळी वाळूउपसा करू नका, आमचे गावातील पाण्याची पातळी खूप खालवत चाललेली आहे. याबाबत तस्करांना अनेकदा समज दिली होती. मात्र, दि.२५ रोजी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास कृष्णा परदेशी व त्याचे साथीदार हे गोदावरी नदीपात्रातून अवैधरित्या वाळूउपसा करून त्यांच्याकडील चार ढंपर व दोन टॅक्टरमधून वाळू घेऊन जात होते.
किशोर शिवाजी शिरसाठ यांनी गावातील लक्ष्मीमाता मंदिरासमोर वाळूची वाहने अडविली. किशोर शिरसाठ यांना कृष्णा परदेशी याने शिवीगाळ करून याचे अंगावर गाडी घाला, याला जीवे ठार मारा, अशी धमकी देऊन गाडी अंगावर घालू लागला. त्यावेळी महिला सरपंच, सासु पुष्पा, मुलगा यश असे गाड्यांना आडवे झालो असता पती किशोर शिरसाठ यांना डंपरची धडक देऊन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला.
पती किशोर शिरसाठ हे धडक दिल्याने रस्त्याच्या बाजूला पडले. आम्ही घाबरुन रस्त्याचे बाजूला झालो. त्यावेळी कृष्णा परदेशी व त्याचे साथीदाराने वाळूने भरलेले डंपर व ट्रॅक्टर तेथन पळवून नेला. कृष्णा परदेशी, पप्पु परदेशी, गणेश परदेशी, विकी परदेशी, बंटी परदेशी व गोट्या ड्रायव्हर (पुर्ण नाव माहीत नाही) हे तिथेच थांबून आम्हाला शिवीगाळ करत होते.
कृष्णा परदेशी यांने फोन करून सुमारे १५ ते २० अनोळखी इसम जैनपूर गावात बोलावून घेतले. वाळूतस्करांनी लाकडी दांडक्याने महिला सरपंच व त्यांच्या पती किशोर यांना मारहाण केली.
पप्पू परदेशी व गणेश परदेशी यांनी व त्यांचे सोबतच्यांनी रस्त्याचे कडेला पडलेले दगडे उचलून आमचे दिशेने फेकून मारल्याने तसेच लाकडी दांडक्याने गावातील लताबाई बबन चकोर, दत्तु पंढरीनाथ आव्हाड व यश किशोर शिरसाठ, पल्लवी ज्ञानेश्वर शिरसाठ, शिवाजी निवृत्ती गिते, भाऊलाल परसराम लहारे यांना मारहाण केल्याने ते जखमी झाल्याची घटना घडली आहे.
गावकरी जमा होत असल्याचे पाहून कृष्णा परदेशी याने पळून जाताना त्याचाकडील गाडी मुलगा यश याचे पायावरून घातल्याने तो जखमी झाल्याने बेशुध्द झालाकृष्णा परदेशी याने सरपंच शैला यांना जातीवाचक शिवीगाळ केली.
तुम्ही नेवाशामध्ये आले तर तुमचा मर्डर झाला म्हणून समजा, अशी धमकी देऊन जैनपूर गावामध्ये दहशत निर्माण केली. पोलिसांचा फौजफाटा आल्यानंतर आजूबाजूचे लोक घरातून बाहेर आले तसेच कुलूपे लावुन पळून गेलेले लोकही पुन्हा घरी आले आहेत.
पोलिसांनी जखमींना दवाखान्यात पाठविले. कृष्णा पुनमसिंग परदेशी व गणेश पुनमसिंग परदेशी या दोघांना ताब्यात घेऊन अटक करण्यात आली. गुन्ह्याचा तपास पोलीस उपअधीक्षक सुनील पाटील हे करीत आहेत. वाळू चोरीच्या गुन्ह्यामधील आरोपींवर जरब बसवण्यासाठी एमपीडीए कायद्यातील तरतुदी अन्वये आम्ही कायदेशीर चाचपणी करीत आहोत. धनंजय जाधव, पोलीस निरीक्षक, नेवासा.