विवेकानंद काटमोरे
मांजरी (पुणे) – महापालिकेत गाव समावेशामुळे शेवाळेवाडी ग्रामस्थांनी एकत्र येत ग्रामपंचायत निवडणुकीवर बहिष्कार टाकला होता. या निर्णयाचे स्वागत होत असताना आज उमेदवारी अर्ज माघारीच्या दिवशी एका वॉर्डातील एका जागेसाठी निवडणूक रंगणार असल्याचे स्पष्ट झाले. 11 सदस्य असलेल्या ग्रामपंचायतीत 10 जागेसाठी एकही अर्ज आलेला नाही, केवळ एकाच जागेसाठी आता चुरशीची निवडणूक होणार का? अशी स्थिती यातून निर्माण झाली आहे.
शेवाळेवाडी ग्रामपंचायत वॉर्ड क्र. 4 मधून तीन अर्ज भरण्यात आले होते. अर्ज माघारीच्या दिवशी या तीनही उमेदवारांनी आपले अर्ज माघारी घ्यावेत, यासाठी ग्रामस्थांनी प्रयत्न केले. मात्र, एका उमेदवाराने त्याला प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे ग्रामस्थांनी एकत्र येऊन त्या उमेदवाराच्या विरोधात गावच्या वतीने एक अर्ज कायम ठेवला असून तिसऱ्या उमेदवाराने अर्ज माघारी घेतला आहे.
त्यामुळे गेल्या आठवड्यात ग्रामस्थांनी एकत्र येत घेतलेल्या बहिष्काराच्या निर्णयाचा फज्जा उडाला. वॉर्ड क्र. 4 मध्ये तीन सदस्य आहेत. परंतु, यातील सर्वसाधारण जागेसाठी वैभव मनोहर शेवाळे, कुणाल संदीप शेवाळे व आकाश सुरेश पवार यांनी अर्ज भरले. आज माघारीच्या शेवटच्या दिवशी या तीनही उमेदवारांनी अर्ज माघारी घ्यावेत, असे आवाहन ग्रामस्थांनी केले. त्यावेळी आकाश सुरेश पवार यांनी आपला उमेदवारी अर्ज माघारी घेतला, तर आता एका जागेसाठी वैभव मनोहर शेवाळे व कुणाल संदीप शेवाळे यांच्यात लढत होत आहे.
शेवाळेवाडी गाव महापालिकेत समाविष्ट होत असल्याने ग्रामपंचायत निवडणुकीवर ग्रामस्थांनी बहिष्कार टाकला होता. परंतु, ग्रामस्थांचा हा निर्णय डावलून एका उमेदवाराने अर्ज माघारी घेतला नाही. आता वॉर्ड क्र. 4 मध्ये दुरंगी लढत होणार आहे.
– पंढरीनाथ शेवाळे, माजी सरपंच, शेवाळेवाडी
निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय झालेला असताना एका उमेदवाराने अर्ज माघारी घेतला नाही, याबाबत ग्रामस्थांमध्ये नाराजी आहे. गावच्या निर्णया विरोधात जाणाऱ्याच्या विरोधात गावच्या वतीने एक उमेदवार देण्यात आला असून त्यालाच विजय करण्याचा प्रयत्न असणार आहे.
– संजय शेवाळे, माजी उपसरपंच
गावच्या निर्णयाला सहकार्य करणे ही सर्वांची जबाबदारी होती. परंतु, ग्रामस्थांच्या या निर्णयाला आव्हान देत एकाने उमेदवारी अर्ज माघारी घेतला नसल्याने निवडणूक होत आहे. यामुळेच गावाने दिलेला उमेदवार विजयी होईल, असा विश्वास आहे.
– विक्रम शेवाळे, उपाध्यक्ष, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस, पुणे जिल्हा
गावच्या हितासाठी सर्वांनी एकत्र येत निर्णय घेतला. परंतु, एका उमेदवाराने प्रतिसाद दिला नाही. गावाला अडचणीत आणण्याचा निर्णय त्याने घेतला आहे. गावाने दिलेल्या उमेदवारालाच आम्ही भरघोस मतांनी निवडून आणू.
– राहुल शेवाळे, उपाध्यक्ष, भाजपा, पुणे जिल्हा
शेवाळेवाडी गावातील 10 जागेसाठी एकही अर्ज आला नाही. तर वॉर्ड क्र. 4 मध्ये सर्वसाधारण जागेसाठी अर्ज प्राप्त झाले होते. यातील आकाश सुरेश पवार यांनी उमेदवारी अर्ज माघारी घेतला आहे. तर, दोन अर्ज असल्याने एका जागेसाठी निवडणूक होत आहे. निवडणूक एका जागेसाठी होत असली तरी, प्रक्रिया पूर्णपणे राबविण्यात येत आहे.
– व्यंकटेश चिरमुल्ला, निवडणूक निर्णय अधिकारी, शेवाळेवाडी आणि वडाचीवाडी