नवी दिल्ली – ऍक्स्ट्राझेनिका आणि ऑक्सफर्ड विद्यापीठाने करोनावर विकसित केलेली लस भारत सरकारला तीन ते चार डॉलरमध्ये म्हणजे 219 ते 292 रुपयात पडेल. खासगी बाजारपेठेत मात्र या लसीची किंमत यापेक्षा दुप्पट म्हणजे सहा ते आठ डॉलर राहील, असे सिरम इन्स्टिट्यूटचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदर पूनावाला यांनी सांगितले.
ऍस्ट्राझेनीका कंपनीच्या लसीचे उत्पादन सिरम इन्स्टिट्यूटमध्ये होत आहे. सिरम इन्स्टिट्यूटने अगोदरच 5 कोटी लसीचे उत्पादन केले आहे. पूनावाला यांनी सांगितले की, पहिल्या टप्प्यात भारत सरकार आणि गाव्ही या संस्थेच्या सदस्य देशांना लस उपलब्ध केली जाईल. त्यानंतर खाजगी क्षेत्राला उपलब्ध केली जाईल.
या लसीला भारताच्या औषध नियंत्रकांनी रितसर परवानगी दिली आहे. लसीचे दर कमी पातळीवर असावे यासाठी आम्ही सुरुवातीपासून प्रयत्न करीत आहोत. भारत सरकार मोठ्या प्रमाणात लस विकत घेणार असल्यामुळे सरकारसाठी दर कमी ठेवण्यात आला आहे. लसीला परवानगी मिळण्याच्या अगोदरच परवानगी मिळेल असे गृहीत धरून सिरम इन्स्टिट्यूटने बरीच गुंतवणूक करून मोठ्या प्रमाणात उत्पादन करून ठेवले आहे.
याचा भारतीय जनतेला उपयोग होत असल्याबद्दल आम्ही समाधानी आहोत असे पूनावाला म्हणाले. भारत सरकारची खरेदी पूर्ण झाल्यानंतर लस खाजगी क्षेत्रासाठी उपलब्ध करण्यात येईल. सध्या महिन्याला 10 कोटी लस उत्पादन क्षमता असून एप्रिलपर्यंत यात दुप्पट वाढ होईल. सरकारला जुलै 2021 च्या अगोदर 30 कोटी लस लागणार आहे.
जोपर्यंत भारत सरकारची गरज पूर्ण होत नाही तोपर्यंत लस निर्यात करण्यास मज्जाव घालण्यात आला आहे का असे विचारले असतात पूनावाला म्हणाले की, आम्ही सरकारकडे निर्यातीसाठी परवानगी मागितली आहे. ही लस परिणामकारक असून यामुळे नागरिकांना इतर कसलेही साइड इफेक्टस् होत नाहीत, असे त्यांनी सांगितले.