बेंगळुरू – भारतीय कम्युनिस्ट पक्षाने कर्नाटक निवडणुकीत कॉंग्रेसला पुर्ण पाठिंबा जाहीर केला आहे. कॉंग्रेस नेते रणदीप सुर्जेवाला यांनी सांगितले की, कम्युनिस्ट पक्षाचे कर्नाटकातील सर्व कार्यकर्ते बिनशर्तपणे कॉंग्रेसला पाठिंबा देणार आहेत.
कम्युनिस्ट पक्षानेच ही भूमिका घेतली आहे असेही त्यांनी नमूद केले. कम्युनिस्ट पक्षाने या राज्यात सात उमेदवार उभे केले आहेत. तथापि या सात मतदार संघात कॉंग्रेस आणि कम्युनिस्ट पक्ष यांच्यात मैत्रीपुर्ण लढत असेल उर्वरीत सर्व मतदार संघात कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते कॉंग्रेसला समर्थन देतील असे ते म्हणाले.
या आधी डाव्या पक्षांकडून आम्हाला समर्थन मिळेल असे जनता दल सेक्युलर पक्षाकडून सांगितले जात होते. पण डाव्या आघाडीतील महत्वाचा पक्ष असलेल्या कम्युनिस्ट पक्षाने मात्र कॉंग्रेसला साथ देण्याचे ठरवले आहे.