वाघोली (प्रतिनिधी) – वाघोली मधील पिण्याचे पाणी सांडपाणी अंतर्गत रस्ते तसेच इतर समस्या प्राधान्य क्रमाने सोडवण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध असून वाघोलीकरांचे प्रश्न लवकरच मार्गी लागणार असल्याचे आश्वासन महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाघोलीकरांना दिले.
वाघोली तालुका हवेली येथील पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य रामभाऊ दाभाडे यांच्या घरी भेट देत उपमुख्यमंत्र्यांनी भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांना तसेच रामभाऊ दाभाडे यांच्या समर्थकांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.
वाघोली मधील अंतर्गत रस्ते पिण्याचे पाणी सांडपाणी तसेच इतर मूलभूत समस्या तातडीने सोडवण्याबाबत रामभाऊ दाभाडे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देऊन विनंती केली.
वाघोली च्या सर्व समस्या पुणे महानगरपालिका आयुक्त व पीएमआरडीए आयुक्त यांच्या संयुक्त बैठकीच्या माध्यमातून लवकरात लवकर सोडविण्यात येईल असे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दाभाडे यांना दिले. यावेळी रामभाऊ दाभाडे यांच्या कार्यकर्त्यांच्या वतीने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले.
यावेळी दौंड चे आमदार राहुल कुल, उद्योजक संतोष देशमुख, माजी उपसरपंच महेंद्र भाडळे, माजी उपसरपंच संदेश आव्हाळे, माजी उपसरपंच कैलास सातव, ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रय कटके, पुणे जिल्हा युवा मोर्चा अध्यक्ष संदीप सातव, भारत सातव, चैतन्य सातव, सागर जाधव, आदी मान्यवर उपस्थित होते.
रामभाऊ दाभाडे भाजपच्या वाटेवर ?
रामभाऊ दाभाडे यांचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी सलोख्याचे व जवळचे संबंध असून सध्या दाभाडे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा वाघोलीत मोठ्या प्रमाणात आहे.
रामभाऊ दाभाडे यांच्या घरी मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी भेट दिली होती. आता उपमुख्यमंत्री असताना देखील दाभाडे यांच्या घरी भेट दिल्याने दाभाडे भाजपच्या वाटेवर असल्याचे चित्र जाणवू लागले आहे.
वाघोली मधील विविध समस्यांच्या बाबतीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून वाघोलीच्या विविध समस्या सोडवण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे.
– रामभाऊ दाभाडे (माजी सदस्य, जिल्हा परिषद पुणे)