पुणे – महाराष्ट्र प्रौढ क्रिकेट संघटना व एज इव्हेंट्स अँड एंटरटेनमेंट यांच्या तर्फे आयोजित दुसऱ्या कमिशनर्स प्रौढ करंडक क्रिकेट स्पर्धेत अंतिम फेरीत रेल्वे वॉरियर्स संघाने जीएसटी जायंटस संघाचा ६ गडी राखून पराभव करत विजेतेपद संपादन केले.
या स्पर्धेत अंतिम लढतीत प्रथम फलंदाजी करताना जीएसटी जायंटस संघाने १० षटकात ६ बाद ८३ धावा केल्या. यात रोहन मारवाहने २७ चेंडूत ४ चौकार व २ षटकाराच्या मदतीने ४८ धावा, मोहसिन खानने नाबाद १६ धावा काढून संघाच्या डावाला आकार दिला. रेल्वे वॉरियर्स संघाकडून नाहिद शेख (३-१६), विश्वनाथ मुंढे (१-२०), हर्षल कगडे (१-१३) यांनी सुरेख गोलंदाजी केली.
Ranji Trophy 2024 #MAHvVID : विदर्भचा महाराष्ट्रावर मोठा विजय…
हे आव्हान रेल्वे वॉरियर्स संघाने ८ षटकात ४ बाद ८४ धावा करून पुर्ण केले. यात युवराज गोळे २१, नाहिद शेख २०, राजेश १९, दिनेश तित्रे १३ यांनी संघाला विजय मिळवून दिला. स्पर्धेचे पारितोषिक वितरण मॅजेस्टिक ग्रुपचे संचालक सौरभ पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र प्रौढ क्रिकेट संघटनेचे कार्यवाह अध्यक्ष रणजीत मोरे, सचिव सुधीर कुलकर्णी, महाराष्ट्र प्रौढ क्रिकेट संघटनेचा कर्णधार व माजी रणजीपटू रणजित खिरीड, एज इव्हेंट्स अँड एंटरटेनमेंटचे संचालक अनिकेत सोमण आदी उपस्थित होते.