नवी दिल्ली – पराक्रम दिवसानिमित्त, दिल्लीत लाल किल्ला येथे ऐतिहासिक प्रतिबिंब आणि प्रकाशमान सांस्कृतिक अभिव्यक्तीचे एकत्रीकरण करत, एक बहुआयामी उत्सव उलगडून दाखवला जाणार आहे. 23 जानेवारीला संध्याकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन होणार असून 31 जानेवारीपर्यंत हा उत्सव सुरू राहणार आहे.
भारतीय पुरातत्व सर्वेक्षण, राष्ट्रीय नाट्य विद्यालय, साहित्य अकादमी आणि भारतीय राष्ट्रीय अभिलेखागार यांसारख्या आपल्या सहयोगी संस्थांच्या संयुक्त विद्यमाने सांस्कृतिक मंत्रालयाने हा सर्वसमावेशक उत्सव आयोजित केला आहे. कार्यक्रमाचा एक भाग म्हणून नेताजी सुभाषचंद्र बोस आणि आझाद हिंद फौज यांच्या गहन वारशाचा शोध घेणाऱ्या अनेक उपक्रमांचे आयोजन या कार्यक्रमाच्या माध्यमातून केले जाईल.
कार्यक्रमादरम्यान, नॅशनल स्कूल ऑफ ड्रामातील कलाकारांच्या व्यासपीठावरील सादरीकरणासह लाल किल्ल्याच्या भिंतींवर शौर्य आणि बलिदानाच्या कथांनी इतिहास आणि चमत्कृतीपूर्ण कला यांचे संमिश्र सादरीकरण केले जाईल. भारतीय राष्ट्रीय लष्करातील दिग्गजांचा यावेळी विशेष सन्मान केला जाईल. लाल किल्ल्यावरील नेताजी आणि आझाद हिंद फौज यांच्या उल्लेखनीय प्रवासाचे वर्णन करणारी दुर्मिळ छायाचित्रे आणि दस्तऐवजांचे प्रदर्शन आणि अभिलेखागारांच्या प्रदर्शनाद्वारे अभ्यागतांना एक अवर्णनीय अनुभव घेता येईल. याशिवाय, चित्रकला आणि शिल्पकला कार्यशाळांचा थेट अनुभव, प्रत्यक्ष आणि आभासी प्रदर्शन आयोजित केले जाणार आहे.
पराक्रम दिवसाचे महत्व
नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या सन्मानार्थ 2021 पासून दरवर्षी पराक्रम दिवस साजरा केला जातो. याचा उद्घाटन कार्यक्रम 2021 मध्ये कोलकात्यात व्हिक्टोरिया मेमोरियल हॉल येथे झाला होता. 2022 मध्ये इंडिया गेट इथे नेताजींच्या त्रिमितीय पुतळ्याचे अनावरण करण्यात आले तर 2023 मध्ये अंदमान आणि निकोबार बेटांच्या 21 सर्वात मोठ्या निनावी बेटांना 21 परमवीर चक्र पुरस्कार विजेत्यांची नावे देण्यात आली आणि नेताजी सुभाषचंद्र बोस द्विपवर बांधणे आवश्यक असलेल्या नेताजींना समर्पित अशा प्रारूप राष्ट्रीय स्मारकाचे अनावरण करण्यात आले.