नवी दिल्ली: करोनाविरोधातील लढाईमध्ये भारत सर्व यथाशक्ती योगदान देण्यास तयार आहे. सामूहिक प्रयत्नातूनच आपण सर्व मानवांना ग्रासणाऱ्या या साथीच्या रोगावर विजय मिळवू शकू, असा आत्मविश्वास आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे व्यक्त केला. अमेरिकेतील करोनाबाधितांसाठी “हायड्रोक्सिक्लोरोक्वीन’ (एचसीक्यू) हे जीवरक्षक औषध उपलब्ध करून देण्याबद्दल ट्रम्प यांनी मोदी यांचे आभार मानले आहेत. त्यावर ट्विटरवरच्या प्रत्युत्तरात मोदींनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
“असे कठीण प्रसंगच खऱ्या मित्रांन जवळ आणत असतात.’ असे मोदी म्हणाले. भारत- अमेरिकेतील भागीदारी आतापूर्वीपेक्षाही अधिक बळकट झाली आहे. मानवतेच्या विरोधात पसरलेल्या “कोविड-19’शी लढा देण्यासाठी भारत सर्वतोपरी प्रयत्न करेल असेही मोदींनी म्हटले आहे.
याआधी, अध्यक्ष ट्रम्प यांनी एका ट्विटमध्ये “एचसीक्यू’ अमेरिकेला उपलब्ध करून देण्याच्या निर्णयाबद्दल भारत आणि भारतीय जनतेचे आभार मानले होते. भारताची कृती विसरून चालणार नाही, असे ट्रम्प म्हणाले होते.
“पंतप्रधान नरेंद्र मोदी या लढ्यात केवळ भारतच नव्हे तर मानवतेला मदत करण्याच्या आपल्या दृढ नेतृत्वाबद्दल आपल्याला धन्यवाद.’ असे ते म्हणाले होते. मोदी आणि ट्रम्प यांनी गेल्या आठवड्यात फोनवरून चर्चा केली होती. या चर्चेदरम्यान ट्रम्प यांनी अमेरिकेला “एचसीक्यू’ उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती.