पुणे – रेल्वेच्या अनेक मार्गांवर प्रवाशांच्या वाढत्या मागणीमुळे “वेटींग लिस्ट’ वाढत आहे. त्यामुळे रेल्वे मंत्रालयाकडून 21 सप्टेंबरपासून क्लोन ट्रेनच्या 40 गाड्या सोडण्यात येणार आहेत. त्यापैकी 4 गाड्या पुणे विभागामार्गे धावणार आहेत.
अनलॉकच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांच्या वाढत्या संख्येमुळे काही मार्गांवरील गाड्यांची “वेटींग लिस्ट’ वाढत होती. या पार्श्वभूमीवर काही “क्लोन ट्रेन’ सोडण्यात येणार आहेत. मूळ गाडीप्रमाणे या गाड्या धावणार आहेत. परंतु, या गाड्यांचे थांबे मर्यादित असणार आहेत. माजी केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या कार्यकाळात “क्लोन ट्रेन’ची संकल्पना मांडण्यात आली होती. मात्र, सध्या अनेक प्रवासी गाड्या रद्द केल्या आहेत. याशिवाय मार्गांवरील गर्दी देखील तुलनेने कमी असल्याने ही संकल्पना प्रत्यक्षात उतरणार आहे.
21 सप्टेंबरपासून धावणाऱ्या “क्लोन ट्रेन’ पैकी 4 गाड्या पुणे विभागातून म्हणजेच पुणे आणि मिरज स्थानकांमार्गे धावणार आहे. यामध्ये वास्को-निझामुद्दीन एक्स्प्रेस, निजामुद्दीन-वास्को एक्स्प्रेस, यशवंतपूर-निजामुद्दीन एक्स्प्रेस, निजामुद्दीन-यशवंतपूर एक्स्प्रेसचा समावेश आहे. गर्दीच्या मार्गावर धावणाऱ्या गाड्यांना तिकीटासाठी वेटींग असल्यास अतिरिक्त क्लोन ट्रेन सोडण्यात येणार आहेत. ही गाडी नियमित वेळेपेक्षा कमी वेळात धावणार आहे.
तिकीट दर समान…
क्लोन गाडी पूर्णत: आरक्षित असून याचे थांबे देखील मर्यादित आहेत. यापैकी 19 जोडी क्लोन ट्रेनला हमसफर गाडीचे रॅक्स वापरण्यात येणार आहेत. तर 1 जोडी क्लोन ट्रेनला जनशताब्दी गाडीचे रॅक्स बसवण्यात येणार आहेत. याचे तिकीट दर देखील हमसफर आणि जनशताब्दी गाड्यांप्रमाणे समान असणार आहेत. यासाठी ऍडव्हान्स रिझर्वेशन पिरियड (एआरपी) 10 दिवसांचा असणार आहे.